सॅपेकटॅकरोत 6, तायक्वांदोत 2 मिळून 8 सुवर्णपदके : 10 सुवर्णपदकांसह गोवा पदकतालिकेत 10 व्या स्थानी
मडगाव : बहुतांश मणिपूरी तसेच देशाचे आंतरराष्ट्रीय सॅपेकटॅकरो स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेल्या खेळाडूंचा समावेश असलेल्या गोव्याच्या सॅपेकटॅकरो संघाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत काल शुक्रवारी निर्भेळ यश संपादन करताना तब्बल सहा सुवर्णपदके मिळविली. या स्पर्धेचे आयोजन नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियमध्ये झाले. फोंड्यात झालेल्या तायक्वांदोत गोव्याल दोन सुवर्णासह एक रौप्यपदक प्राप्त झाले. एकंदरीत काल शुक्रवारी गोव्याला आठ सुवर्णपदके मिळाली. त्यामुळे कालचा शुक्रवार गोव्याला सुवर्णमय ठरला. शुक्रवारी गोव्याने मिळविलेल्या आठ सुवर्ण पदकांसह गोवा आता पदकतालिकेत 19 व्या स्थानावरुन 10 व्या स्थानी पोहोचला आहे. गोव्याला आतापर्यंत 10 सुवर्ण, 11 रौप्य, 26 कास्य मिळून एकूण 47 पदके प्राप्त झाली आहेत. 60 सुवर्णासह महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. सेनादल दुसऱ्या, हरियाणा तिसऱ्या तर कर्नाटक चौथ्या स्थानी आहे.
तायक्वांदोत दोन सुवर्ण, एक कास्य
फोंडा येथील क्रीडा प्रकल्पच्या इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या तायक्वांदो खेळात गोव्याला दोघा बंधुनी सुवर्ण व रौप्यपदक मिळवून दिले. पुरुषांच्या 87 कि. ग्रॅ. वरील गटात पी. आनंदने सुवर्ण तर त्याचा छोटा भाऊ पी. सर्वानकुमार याने रौप्यपदक पटकावून चमकदार कामगिरी केली. महिला गटात गोव्याच्या रोदाली बारुआने सुवर्णपदक पटकावले.
सॅपेकटॅकरोत गोवा मालामाल
सॅपेकटॅकरोत सहा सुवर्णपदकांसह गोव्याने या स्पर्धेत प्रत्येकी एक रौप्य व कास्यपदकही मिळविले. या स्पर्धेत आरंभापासूनच यजमान गोव्याचे वर्चस्व आढळून आले होते. या सहा सुवर्ण व प्रत्येकी एक रौप्य व कास्य पदकांमुळे गोव्याच्या सॅपेकटॅकरो संघाला शासनाने घोषित केलेले 21 लाख रुपये मिळणार आहेत. गोव्याच्या सॅपेकटॅकरो संघाने पुरूषांच्या डबल्स, क्वाड, सांघिक व रेग्यू प्रकारात सुवर्ण तर महिलांनी क्वाड व डबल्समध्ये सुवर्णपदके प्राप्त केली. याव्यतिरिक्त गोव्याने सांघिक विभागात रौप्य तर रेग्यूमध्ये ब्राँझपदके प्राप्त केली.
पुरूषांच्या डबल्समध्ये सुवर्णपदक प्राप्त करताना गोव्याने अंतिम लढतीत केरळचा 21-13, 22-20 असा पराभव केला आणि सुरूवात छान केली. पुरूषांच्या क्वाडमध्येही वर्चस्व ठेवत अंतिम लढतीत गोव्याने दिल्लीचा 21-14, 17-21, 21-17 असा पराभव केला व दुसरे सुवर्णपदक मिळविले. पुरूषांची सांघिक विभागातील अंतिम लढत चांगलीच रंगली. गोव्याने या लढतीत बलाढ्या मणिपूरचा पहिल्या रेग्यूत 21-15, 21-18 असा पराभव केला. दुसऱ्या रेग्यूत मणिपूरने चांगला संघर्ष करताना गोव्यावर 21-14, 21-16 अशी मात केली व लढत 1-1 अशी बरोबरीत आणली. निर्णायक तिसऱ्या लढतीत गोव्याने आक्रमक खेळाच्या बळावर 21-14, 21-12 असा पराभव केला व तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले.
पुरूषांच्या संघाने गोव्याला दिवसभरातील चौथे सुवर्ण रेग्यू प्रकारात मिळवून देताना मणिपूरचा 21-15, 21-17 असा पराभव केला. गोव्याला महिला संघाने क्वाड प्रकारात पहिले सुवर्ण मिळवून देताना हरियाणाचा 21-11, 23-21 असा पराभव केला. महिला संघानेही डबल्समध्ये दुसरे सुवर्णपदक मिळविले. महिलांच्या सांघिक विभागात गोव्याच्या महिला संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. रौप्यपदक मिळविलेल्या गोव्याच्या महिला संघाचा मणिपूरने पहिल्या रेग्यूत 21-14, 21-10 तर दुसऱ्या रेग्यूत 21-9, 21-3 असा पराभव केला. गोव्याच्या महिला संघाला रेग्यूत गुरूवारी ब्रॉझपदक मिळाले होते.