डायमंड लीगमध्ये 87.66 मीटर भाला फेकत जिंकले सुवर्ण : क्रमवारीत अव्वल स्थानी झेप
वृत्तसंस्था/ लुसाने (स्वीत्झर्लंड)
दोन महिने दुखापतीमुळे मैदानापासून दूर राहिलेल्या भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्राने पुनरागमन करताना जबरदस्त कामगिरी केली. लुसाने डायमंड लीगमध्ये त्याने पिछाडीवरून पुढे निर्णायक कामगिरी करताना सुवर्णपदक पटकावले. यासह त्याने डायमंड लीगमधील आपले वर्ल्ड लीड कायम ठेवले आहे. नीरजने पाचव्या प्रयत्नात 87.66 मीटर भाला फेकत सुवर्णपदकाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, नीरजने याआधी दोहा डायमंड लीगमध्ये 88.67 मीटर भालाफेक करत पहिले स्थान मिळवले होते. जर्मनीच्या ज्युलियन वेबरने 87.03 मीटरसह दुसरे तर झेक प्रजासत्ताकच्या जेकबने 86.13 मीटरसह तिसरे स्थान पटकावले. याशिवाय, लांब उडीत भारताच्या मुरली श्रीशंकरला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
नीरज चोप्राचे हे आठवे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आहे. याआधी त्याने आशियाई खेळ, दक्षिण आशियाई खेळ आणि ऑलिम्पिक यांसारख्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. तर यावर्षी नीरज चोप्राच्या खात्यात हे दुसरे सुवर्णपदक आले आहे. या वर्षी मे महिन्यात दोहा डायमंड लीगमध्ये नीरजने 88.67 मीटर फेक केला होता. या स्पर्धेनंतर त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला. यामुळे त्याला काही स्पर्धांमधून आपले नाव मागे घ्यावे लागले. मात्र, या काळात नीरजने आपल्या फिटनेसवर मेहनत घेतली आणि लुसाने डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.
खराब सुरुवातीनंतर गोल्डन कामगिरी
लुसाने डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने फाऊलसह सुरुवात केली. मात्र, त्याचा दुसरा आणि तिसरा प्रयत्न दमदार ठरला. त्याने दुसऱ्या प्रयत्नात 83.52 मीटर फेक केली, तर तिसरा थ्रो 85.04 मीटरचा होता, मात्र या तीन प्रयत्नांच्या स्कोअरच्या आधारे जर्मनीच्या ज्युलियन वेबरने 86.20 असे अंतर गाठून आघाडी कायम राखली. दरम्यान, नीरजचा चौथा प्रयत्नही फाऊल झाला. यामुळे तो दडपणाखाली आला पण पाचवा प्रयत्न त्याच्यासाठी गोल्डन आर्म ठरला आणि त्याने 87.66 मीटर लांब फेक केली. या थ्रोने तो पुढे गेला. याचवेळी त्याचा शेवटचा थ्रो 84.15 मीटर होता. नीरजला जर्मनीच्या ज्युलियन वेबरकडून कडवी टक्कर मिळाली. वेबरने शेवटच्या प्रयत्नात 87.03 मीटर फेक केली. मात्र, सुवर्णपदकापर्यंत त्याला हे अंतर पार करता आले नाही आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तर झेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेजेने कांस्यपदकासह तिसरे स्थान पटकावले.
भालाफेकमध्ये नीरज चोप्रा ‘नंबर वन’
मे महिन्यात दोहा येथे आयोजित डायमंड लीग जिंकल्यानंतर नीरजने भालाफेकच्या क्रमवारीत आणखी एक यश मिळवलं. 22 मे रोजी तो नंबर-1 अॅथलीट बनला होता. यानंतर लुसाने लीगमध्ये देखील नीरजने पुन्हा एकदा इतिहास रचून भारताचे नाव उंचावले आहे. या कामगिरीमुळे जागतिक भालाफेक क्रमवारीत त्याने 1455 गुणासह आपले अग्रस्थान आणखी भक्कम केले आहे. विशेष म्हणजे, नीरजने प्रथमच हे मानांकन मिळवून इतिहास रचला आहे. भालाफेक प्रकारात कोणत्याही भारतीयाने मिळवलेले हे सर्वोच्च यश आहे.
नीरजच्या या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, भारतीय अॅथलेटिक्स महासंघ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, नेमबाज अभिनव बिंद्रा, माजी धावपटू पीटी उषा यांच्यासह अनेक क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
बुडापेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी होणार
लुसान डायमंड लीग स्पर्धेतील यशानंतर नीरज आता पुढील महिन्यात होणाऱ्या बुडापेस्ट वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी होणार आहे. ही स्पर्धा 19 ते 27 ऑगस्ट दरम्यान हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे होईल. गतवर्षी झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र नीरजकडून धमाकेदार कामगिरीची अपेक्षा असेल.









