विमानतळावरील कारवाईत तिघांना अटक
वृत्तसंस्था/ हैदराबाद
महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक प्रवासी आणि दोन ग्राउंड ड्युटी कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या सोन्याच्या तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला. डीआरआय अधिकाऱ्यांनी 3 कोटी 45 लाख 79 हजार 300 रुपये किमतीचे 3.5 किलो सोने जप्त करत तिघांना ताब्यात घेतले. सदर प्रवासी दुबईहून मस्कत मार्गे हैदराबाद विमानतळावर पोहोचला होता. विमानतळावर उतरल्यानंतर त्याने सोन्याच्या बार ग्राउंड ड्युटी कर्मचाऱ्यांना सोपवल्या. हे सोने ग्राउंड ड्युटी कर्मचाऱ्यांना विमानतळाबाहेर तस्करी करून प्रवाशाच्या सहकाऱ्याकडे सोपवायचे होते. यासंबंधीची माहिती मिळताच डीआरआय अधिकाऱ्यांनी पार्किंग क्षेत्रात प्रवासी आणि दोन ग्राउंड ड्युटी कर्मचाऱ्यांना अडवून 30 सोन्याचे बार जप्त केले. याप्रकरणी प्रवासी आणि दोन ग्राउंड स्टाफ सदस्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









