रिलेमध्ये अमेरिकेचे वर्चस्व, मिहाम्बो, इंगेब्रिजत्सेन, एथिंग मु, केव्हिन मेयर्स यांनाही सुवर्ण
वृत्तसंस्था/ युजीन, अमेरिका
वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या दहाव्या दिवशी नायजेरियाच्या टोबी अमुसनने महिलांच्या 100 मी. हर्डल्समध्ये आणि स्वीडनच्या अरमांड ‘मोन्डो’ डुप्लांटिसने पुरुषांच्या पोल व्हॉल्टमध्ये नवे विश्वविक्रम नोंदवत सुवर्णपदके पटकावली. महिला व पुरुष रिलेमध्ये अमेरिकेने वर्चस्व राखले तर लांब उडीत मिहाम्बोने, डेकॅथलॉनमध्ये केव्हिन मेयरने, महिलांच्या 800 मी.मध्ये एथिंम मु हिने, पुरुषांच्या 5000 मी. नॉर्वेच्या जेकब इंगेब्रिजत्सेनने सुवर्णपदक पटकावले.

25 वर्षीय अमुसनने 100 मी. हर्डल्सच्या उपांत्य फेरीत शानदार प्रदर्शन नवा विश्वविक्रम नोंदवला. नंतर अंतिम फेरीत सुवर्णपदकही निश्चित केले. उपांत्य फेरीत तिने 12.12 सेकंदाचा नवा विक्रम नोंदवत 12.20 सेकंदाचा विक्रम मागे टाकला. नंतर अंतिम फेरीत तिने त्यापेक्षाही जास्त वेगाने धावत 12.06 सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण पटकावले. त्याआधी शनिवारी तिने 12.40 सेकंदाचा नवा आफ्रिकन विक्रमही नोंदवला होता. वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण मिळविणारी ती नायजेरियाची पहिलीच ऍथलीट आहे.
डुप्लांटिसची विश्वविक्रमी झेप
पुरुषांच्या पोल व्हॉल्टमध्ये स्वीडनच्या डुप्लांटिसने पूर्ण वर्चस्व राखत नव्या विश्वविक्रमासह सुवर्ण पटकावले. त्याचा हा पाचवा विश्वविक्रम असून या वर्षातील तिसरा विक्रम आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन असलेल्या डुप्लांटिसचे हे पहिलेच वर्ल्ड टायटल आहे. त्याने 6.21 मी.ची उंची नोंदवली. गेल्या मार्चमध्ये त्याने वर्ल्ड इनडोअर चॅम्पियनशिपमध्ये विश्वविक्रम नोंदवला होता, त्यापेक्षा फक्त 1 सेंटीमीटर जास्त उडी घेत त्याने नवा विक्रम नोंदवला. अमेरिकेच्या ख्रिस नेल्सनने 5.94 मी. उडी घेत रौप्य व फिलिपाईन्सच्या अर्नेस्ट ओबियांगने कांस्य मिळविले. या स्पर्धेतील फिलिपाईन्सचे हे पहिलेच पदक आहे. ओबियांग व नेल्सन दोघांनीही समान अंतर नोंदवले होते. पण काऊंटबॅकमध्ये नेल्सनने बाजी मारत रौप्य मिळविले.
लांब उडीत मलायका मिहाम्बोचे यश

जर्मनीच्या मलायका मिहाम्बोने महिलांच्या लांब उडी प्रकारावरील वर्चस्व कायम राखत सलग दुसऱयांदा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले.ाdन तिने 7.12 मी. लांब उडी घेतली. पहिल्या व दुसऱया प्रयत्नात तिने फाऊल केले होते. त्यामुळे ती स्पर्धेबाहेर पडण्याच्या वाटेवर होती. तिसऱया प्रयत्नात तिने 6.98 मी. अंतर नोंदवले. त्यानंतर तिने वर्चस्व राखत चौथ्या प्रयत्नात सात मीटर अंतर पार केले. शेवटच्या प्रयत्नात तिने 7.12 मी. अंतर गाठत शानदार शेवट केला. नायजेरियाच्या इसे ब्रुमने 7.02 मी. अंतर नोंदवत रौप्य व ब्राझीलच्या लेटिसिया ओरो मेलोने 6.89 मी.अंतर नोंदवत कांस्यपदक मिळविले. या मोसमात सर्वाधिक अंतर (7.13 मी.) नेंदवलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ब्रूक बुश्कुहेलला येथे पाचवे स्थान मिळाले.
पुरुष व महिला रिलेमध्ये अमेरिकेचे वर्चस्व

महिलांच्या 4ƒ400 मी. रिलेमध्ये अमेरिकेने सलग तिसऱयांदा सुवर्णपदक पटकावताना 3ः17.79 मि. वेळ नोंदवली. अमेरिकेचे हे एकूण 13 वे सुवर्णपदक आहे. जमैकाला रौप्य व ब्रिटनला कांस्यपदक मिळाले. जमैकाच्या धावपटूंनी 3ः20.74 मि. तर ब्रिटनच्या धावपटूंनी 3ः22.64 मि. वेळ नोंदवला. अमेरिकेने पदकतक्त्यात 13 सुवर्णासह एकूण 33 पदके पटकावत नवा चॅम्पियनशिप विक्रम नोंदवला. या शर्यतीने या स्पर्धेची सांगता करण्यात आली.
पुरुषांच्या विभागात अमेरिकेने आपली मक्तेदारी कायम राखत सुवर्ण पटकावले. इलिजा गुडविन, ब्राईस डेडमॉन, मायकेल नॉर्मन, चॅम्पियन ऍलिसन यांनी 2 मिनिटे 56.17 सेकंद वेळ नोंदवली. अमेरिकेने गेल्या 9 स्पर्धांत 8 वेळा आणि दहा ऑलिम्पिकमध्ये 8 वेळा या प्रकारात सुवर्णपदके पटकावली आहेत. जमैकाच्या खेळाडूंनी रौप्य व बेल्जियमने कांस्यपदक मिळविले.

मेयर व एथिंग मु यांची बाजी
डेकॅथलॉनमध्ये फ्रान्सच्या केव्हिन मेयरने दुसऱयांदा सुवर्णपदक पटकावले. दहा क्रीडा प्रकारांच्या या स्पर्धेत त्याने एकूण 8816 गुण नोंदवले. यापूर्वी 2017 लंडनमधील स्पर्धेत त्याने सुवर्ण मिळविले होते. कॅनडाच्या पियर्स लीपेजने 8701 गुण घेत रौप्य व अमेरिकेच्या झॅक झीमेकने 8676 गुणांसह कांस्यपदक मिळविले.
महिलांच्या 800 मी. शर्यतीत अमेरिकेच्या ऑलिम्पिक चॅम्पियन एथिंग मु हिने सुवर्ण पटकावले. तिच्याशी जोरदार चुरस केलेल्या ब्रिटनच्या कीली हॉजकिन्सनने रौप्य पटकावले. एथिंगने 1 मि.56.30 सेकंद वेळ नोंदवली तर हॉजकिन्सनने 1ः56.39 मि. वेळ घेतला. केनियाच्या मेरी मोराने 1ः56.71 मि. वेळ नोंदवत कांस्य मिळविले.
पुरुषांच्या 5000 मी.मध्ये जेकब इंगेब्रिजत्सेनने तीन लॅप्स बाकी असताना घेतलेली आघाडी कायम राखत सुवर्ण मिळविले. नॉर्वेच्या या धावपटूला 1500 मी. शर्यतीत दुसऱया स्थानावर समाधान मानावे लागले होते. पण यावेळी मागील शर्यतीतील चूक दुरुस्त करीत यश मिळविले. त्याने 13 मिनिटे 09.24 से. वेळ नोंदवली. केनियाच्या जेकब क्रॉपने रौप्य व युगांडाच्या ऑस्कर चेलिमाने कांस्यपदक मिळविले.
ं









