श्रहर्ष रामकृष्णलाही सुवर्ण, दोघांचा पॅरालिम्पिक्स कोटा निश्चित
वृत्तसंस्था/ चतेरॉ, फ्रान्स
टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये सुवर्ण मिळविलेल्या भारताच्या अवनी लेखराने येथे सुरू असलेल्या चतेरॉ पॅरानेमबाजी विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 10 मी. एअर रायफल स्टॅडिंग एसएच 1 मध्ये नव्या विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावले. पुरुषांमध्ये श्रीहर्ष रामकृष्णनेही 10 मी. एअर रायफल एसएच 2 मध्ये सुवर्णपदक मिळविले. दोघांनीही 2024 पॅरिस पॅरालिम्पिक्समधील तिकीटही निश्चित केले आहे.
20 वर्षीय अवनी लेखराने 249.6 गुणांचा स्वतःचाच विक्रम मागे टाकत 250.6 गुणांचा नवा विश्वविक्रम नोंदवला. पोलंडच्या एमिलिया बाबस्काने 247.6 गुणांसह रौप्य तर स्वीडनच्या ऍना नॉर्मनने 225.6 गुणांसह कांस्यपदक मिळविले. एसएच 1 प्रकारात खेळाडूंच्या शरीराच्या खालील भागात व्यंग असते. ‘टोकियोनंतरची ही माझी पहिलीच स्पर्धा असल्याने हे यश माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. यात विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावता आले तसेच पहिला ऑलिम्पिक कोटा मिळविता आला याचा खूप आनंद वाटतो. मला ज्यांनी भरभरून पाठिंबा दिला त्यांचा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडामंत्री अनुराग ठाकुर, भारतीय पॅरालिम्पिक्स संघटना यांची मी खूप खूप आभारी आहे,’ अशा भावना तिने ट्विटमधून व्यक्त केल्या. या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तिचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

तीन दिवसांपूर्वी अवनी व तिचे प्रशिक्षक यांना व्हिसा नाकारल्यामुळे या स्पर्धेत ती सहभागी होऊ शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. क्रीडा मंत्रालय व साई यांनी प्रयत्न करून तिला वेळेत व्हिसा मिळवून दिल्यानंतर ती येथे सहभागी होऊ शकली. गेल्या वर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिने एक सुवर्ण व एक रौप्यपदक पटकावताना पॅरालिम्पिक्समध्ये एकाहून अधिक पदके मिळविणारी ती पहिली भारतीय महिला बनली होती.
श्रीहर्ष देवरड्डी रामकृष्ण हा पॅरालिम्पिक्समधील कोटा मिळविणारा भारताचा दुसरा पॅरा नेमबाज बनला आहे. त्याने मिश्र 10 मी. एअर रायफल एसएच 2 नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले. रामकृष्णने 253.1 गुण नोंदवत सुवर्ण, स्लोव्हाकियाच्या फ्रान्सेक तिर्सेकने 252.6 गुणांसह रौप्य व टँगॉय डी ला फॉरेस्टने 230.3 गुणांसह कांस्यपदक घेतले. येथील स्पर्धेत भारताच्या 13 पॅरानेमबाजांनी भाग घेतला आहे.









