विश्वचषक तिरंदाजी स्टेज 1 ः अंतिम लढतीत ब्रिटिश जोडीवर मात, भारताला एकूण 2 सुवर्ण
वृत्तसंस्था/ ऍन्टाल्या
येथे सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्टेज 1 स्पर्धेत भारताने दुसरे सुवर्ण मिळविले. रिकर्व्ह मिश्र सांघिक प्रकारात तरुणदीप राय व रिद्धी फोर यांनी गेट ब्रिटनच्या जोडीचा शूटऑफमध्ये पराभव करीत हे पदक मिळवून दिले.
तरुणदीप राय व रिद्धी प्रथमच एकत्र खेळत असून ते ग्रेट ब्रिटनच्या ब्रायोनी पिटमन व ऍलेक्स वाईज या जोडीविरुद्ध 0-2 व नंतर 2-4 असे पिछाडीवर पडले होते. पण नंतर मुसंडी मारत त्यांनी ही लढत 5-4 (35-37, 36-33, 30-40, 38-37) (18-17) अशी जिंकत पहिले सुवर्णपदक मिळविले. या पहिल्या टप्प्यात भारताने 2 सुवर्णपदके मिळविली. पहिले सुवर्ण पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात अभिषेक वर्मा, रजत चौहान, अमन सैनी यांनी शनिवारी मिळवून दिले होते.
रायने यापूर्वी 2010 मधील गुआंगझोयूतील स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. त्याचे वर्ल्ड कपमधील मिश्र सांघिक दुहेरीत मिळविलेले पहिलेच सुवर्णपदक आहे. 17 वर्षीय रिद्धीचे हे वर्ल्ड कपमधील पहिले पदक आहे. ही जोडी दोनदा पिछाडीवर पडली होती. पण जिगरबाज खेळ करीत नंतर शूटऑफमध्ये दोनदा 9 गुणांची कमाई करीत जेतेपद पटकावले.









