मिराबाईला सुवर्ण, संकेतला रौप्य, गुरुराजाला कांस्य!
बर्मिंगहम / वृत्तसंस्था
शनिवारी बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेचा दुसरा दिवस भारतीय वेटलिफ्टर्सनी तीन विभिन्न रंगाची पदके जिंकून गाजवला! मिराबाई चानूने 49 किलोग्रॅम वजनगटात सुवर्ण जिंकत आपले जेतेपद कायम राखले तर याचवेळी सांगलीच्या संकेत सरगरने 55 किलो गटात रौप्य तर गुरुराजा पुजारीने 61 किलो वजन गटात कांस्य जिंकण्याचा पराक्रम गाजवला. स्पर्धेच्या एकाच दिवशी एकाच खेळातून तीन वेगवेगळी पदके जिंकण्याचा अनोखा विक्रमही यावेळी भारताच्या खात्यावर जमा झाला!

ऑलिम्पिक रौप्यजेती मिराबाई चानूने 201 किलोग्रॅम (88 व 113 किलोग्रॅम) वजन उचलत स्पर्धेवरील आपली हुकूमत पुन्हा एकदा अधोरेखित केली. या इव्हेंटमध्ये मॉरिशसच्या मेरी हनित्रा रॉलिया रनाईव्होसोआने (172 किलोग्रॅम) रौप्य तर कॅनडाच्या हन्नाह कॅमिन्स्कीने (171 किलोग्रॅम) कांस्यपदक संपादन केले.
आपल्या वयोगटात जेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून ओळखल्या गेलेल्या 27 वर्षीय चानूने स्नॅचमध्ये प्रारंभी 80 किलोग्रॅमचे लो स्टार्निंग टार्गेट ठेवले आणि त्यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये 105 किलो वजन उचलत सुवर्णपदकाच्या मोहिमेला वेग दिला. निर्णायक टप्प्यात प्रतिस्पर्ध्यांपेक्षा सरस कामगिरी साकारत तिने अव्वलस्थान काबीज केले. तिने त्यानंतर दुसऱया प्रयत्नात 88 किलोग्रॅम तर तिसऱया प्रयत्नात 90 किलोग्रॅम उचलले.
यादरम्यान 88 किलोग्रॅम व 119 किलोग्रॅमचे कारकिर्दीतील सर्वोत्तम रेकॉर्ड ती मागे टाकू शकली नसली तरी यादरम्यान रनाईव्होसोआवर मिळवलेली 12 किलोग्रॅमची आघाडी तिला सुवर्ण जिंकून देऊन गेली. रौप्य व कांस्यपदकासाठी कॅमिन्स्की व रनाईव्होसोआसह नायजेरियन लिफ्टर किंग्स्ले यांच्यात चुरस होती. मात्र, यातील किंग्स्लेची एक लिफ्ट नाटय़मयरित्या बाद ठरवली गेली आणि ती पदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकली गेली.









