फुकुओका (जपान) :
येथे सुरू झालेल्या विश्व जलतरण संघटनेच्या विश्व चॅम्पियनशिप जलतरण स्पर्धेत अमेरिकेची महिला जलतरणपटू केटी लिडेकीने महिलांच्या 1500 मी. फ्रिस्टाईल प्रकारात सुवर्णपदक पटकावत अमेरिकेचा माजी जलतरणपटू मायकेल फेल्प्सच्या विक्रमाशी बरोबरी साधली.
या स्पर्धेत महिलांच्या 1500 मी. फ्रिस्टाईल प्रकारात मंगळवारी लिडेकीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपली आघाडी कायम राखत सुवर्णपदक मिळवताना 15 मिनिटे 26.27 सेकंदाचा अवधी घेतला. विश्व जलतरण चॅम्पियनशिप स्पर्धेतील लिडेकीचे हे 15 वे वैयक्तिक विजेतेपदक असून तिने अमेरिकेचा माजी ऑलिम्पिक जलतरणपटू मायकेल फेल्प्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. 1500 मी. फ्रिस्टाईल प्रकारातील लिडेकीचे हे पाचवे अजिंक्यपद आहे. गेल्या 10 वर्षांच्या कालावधीत तिने विश्व जलतरण स्पर्धा किंवा ऑलिम्पिक स्पर्धा यामध्ये या क्रीडा प्रकारात आपले वर्चस्व ठेवले आहे. जपानमधील या स्पर्धेत इटलीच्या सिमोना क्वेड्रेलाने 1500 मी. फ्रिस्टाईल प्रकारात 15 मिनिटे 43.31 सेकंदाचा अवधीत घेत रौप्यपदक तर चीनच्या बिंगजीने 15 मिनिटे 45.71 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदक मिळवले. आता लिडेकी शनिवारी या स्पर्धेत होणाऱ्या महिलांच्या 800 मी. फ्रिस्टाईल प्रकारात सहभागी होत आहे.
पुरुषांच्या 100 मी. बॅकस्ट्रोक प्रकारात अमेरिकेच्या रेयान मर्फीने सुवर्णपदक मिळवताना 52.22 सेकंदाचा अवधी नोंदवला. या प्रकारात सिकॉनने रौप्य तर आर. अॅमस्ट्राँगने कास्यपदक मिळवले. महिलांच्या 100 मी. ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात लिथुनियाच्या रुटा मेलुटेटीने सुवर्णपदक मिळवताना 1 मिनिटे 04.62 सेकंदाचा अवधी घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या स्कुनेमेकरने रौप्यपदक तर अमेरिकेच्या जेकोबायने कास्यपदक मिळवले. महिलांच्या 100 मी. बॅकस्ट्रोकचे सुवर्णपदक ऑस्रटेलियाच्या केली मॅकॉनने पटकावले. पुरुषांच्या 200 मी. फ्रिस्टाईलमध्ये ब्रिटनच्या मॅथ्यू रिचर्डसने सुवर्णपदक घेतले.









