वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने कोरियातील चांगवाँन येथे सुरू असलेल्या आशियाइं नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 50 मी. रायफल 3 पी वैयक्तिक विभागात सुवर्ण पटकावले तर सांघिक प्रकारात रौप्य मिळविले.
22 वर्षीय तोमरने अंतिम फेरीत 463.5 गुण नोंदवत सुवर्ण घेतले. चीनच्या तियान जियामिंगने 462.7 गुण घेत रौप्य व चीनच्याच डु लिनशूने 450.3 गुण घेत कांस्य मिळविले. पात्रता फेरीत तोमरने 591 गुण घेत पाचवे स्थान मिळविले होते. तोमर, स्वप्निल कुसाळे, अखिर शेरॉन या भारतीय संघाने एकूण 1764 गुण घेत रौप्य मिळविले. या प्रकारात चीन संघाने 1777 गुण घेत सुवर्ण मिळविले. या स्पर्धेआधीच भारताने कुसाळे व शेरॉन यांच्यामार्फत दोन ऑलिम्पिक कोटा मिळविले आहेत. कुसाळेने गेल्या वर्षी कैरोत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तर शेरॉनने यावर्षी बाकू येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधे ऑलिम्पिक कोटा मिळविला होता.









