विजापूर-मनगुळीतील कॅनरा बँकेत महिनाभरापूर्वी चोरी : माजी वरिष्ठ व्यवस्थापकासह त्रिकुटाला अटक, साडेदहा किलो सोने हस्तगत
विजापूर : विजापूर जिल्ह्यातील मनगुळी येथील कॅनरा बँकेच्या लॉकरमधून 53 कोटी 26 लाख रुपये किमतीचे 58 किलो 97 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरण्यात आले होते. तब्बल एक महिन्यानंतर केवळ राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या मोठ्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात विजापूर पोलिसांना यश आले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी गुरुवारी पत्रकारांना ही माहिती दिली आहे. कॅनरा बँकेचा माजी व्यवस्थापकच प्रमुख आरोपी असून या प्रकरणी तिघा जणांना अटक करून 10 कोटी 75 लाख रुपये किमतीचे साडेदहा किलो सोन्याचे दागिने, गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत. पत्रकार परिषदेत अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शंकर मारिहाळ, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख रामनगौडा हट्टी यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. 23 मे च्या सायंकाळी 6 पासून 25 मे च्या सकाळी 11.30 या वेळेत मनगुळी येथील कॅनरा बँकेच्या खिडकीचे गज कापून चोरी करण्यात आली होती. सेफ लॉकर रुमच्या सळ्याही कापण्यात आल्या होत्या.
बनावट चाव्यांच्या मदतीने लॉकर उघडून 58 किलो 976 ग्रॅम सोने, 5 लाख 20 हजार 450 रुपये रोख रक्कम चोरट्यांनी पळविली होती. केवळ कर्नाटकच नव्हे तर संपूर्ण देशात या चोरी प्रकरणाची चर्चा सुरू होती. या खळबळजनक चोरी प्रकरणाच्या तपासासाठी बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक चेतनसिंग राठोड, विजापूरचे जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आठ विशेष पथके नियुक्त करण्यात आली होती. पोलीस उपअधीक्षक टी. ए. सुल्फी, सुनील कांबळे, बल्लाप्पा नंदगावी, पोलीस निरीक्षक रमेश आवजी, गुरुशांत दाशाळ, अशोक चव्हाण, उपनिरीक्षक श्रीकांत कांबळे, अशोक नायक, देवराज उळ्ळागड्डी, बसवराज तिप्परेड्डी, राकेश बगली, सोमेश गेज्जी, विनोद दोडमनी, विनोद पुजारी, शिवानंद पाटील, यतीश के., नागरत्न उप्पलदिन्नी आदींसह आणखी अनेक अधिकारी व पोलिसांचा या पथकामध्ये समावेश होता.तब्बल एक महिन्यानंतर खळबळजनक चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
चोरीनंतर पोलिसांना चकवण्यासाठी गुन्हेगारांनी अनेक क्लृप्त्या लढवल्या होत्या. तरीही तांत्रिक विभागाच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्यात विशेष पथकांना यश आले आहे. या पथकातील अधिकाऱ्यांनी केवळ कर्नाटकच नव्हे तर परराज्यातही तपास केला आहे. शेवटी चोरटे आतीलच निघाले आहेत. गुरुवारी दिलेली माहिती या प्रकरणाचा पहिला भाग आहे. दुसरा भाग लवकरच जाहीर करण्यात येईल, असे पोलीसप्रमुखांनी सांगितले. कॅनरा बँक मनगुळी शाखेत याआधी वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून सेवा बजावणारा विजयकुमार मोहनराव मिरियाल (वय 41) राहणार कोठारीनगर, गदग रोड, हुबळी, चंद्रशेखर कोटीलिंगम नेरेल्ला (वय 38) राहणार जनता कॉलनी, गदग रोड, हुबळी, सुनील नरसिंहलू मोका (वय 40) राहणार चालुक्यनगर, गदग रोड, हुबळी अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत. या प्रकरणातील आणखी अनेक आरोपी फरारी असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीसप्रमुखांनी व्यक्त केला.
कर्नाटक राज्यातील सर्वात मोठी चोरी
संपूर्ण राज्यात आजवर झालेल्या बँकेतील ही मोठी चोरी होती. गुन्हेगारांनी पोलीस दलासमोर तपासाचे आव्हान उभे केले होते. पोलिसांना चकवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे एनव्हीआरही पळविण्यात आले होते. त्यामुळे चोरटे कोण? याचा माग काढणे कठीण जात होते. तांत्रिक विभागाच्या मदतीने पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेतला आहे. तब्बल दोन ते तीन महिने बारकाईने पाहणी करून, कट रचून ही चोरी करण्यात आली असून शेवटी चोरटे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
चोरीसाठी गुन्हेगारांनी केली भरपूर तयारी
कर्नाटकातील आजवरच्या मोठ्या चोरीसाठी या गुन्हेगारांनी भरपूर तयारी केली आहे. फेब्रुवारीपासूनच योजना सुरू करण्यात आली होती. विजयकुमारने लॉकरच्या बनावट चाव्या बनवून घेतल्या. आपण बनवून घेतलेल्या चाव्यांनी लॉकर उघडतो की नाही, याचीही खात्री करून घेतली. आपल्यावर संशय बळावू नये म्हणून आपली बदली झाल्यानंतरच प्रत्यक्षात चोरी करायची, हे ठरवण्यात आले. अनेक वेळा बँक परिसरात जाऊन पाहणी करण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेरे कोठे आहेत, या कॅमेऱ्यात आपली छबी कैद होऊ नये, यासाठी काय करावे? याचीही खबरदारी घेण्यात आली. पाहणीसाठी या गुन्हेगारांनी दुचाकीचा वापर केला. फिरण्यासाठी वापरलेली दुचाकी ट्रकमधून मनगुळी बाहेर पाठवण्यात आली. जेणेकरून या दुचाकीवरून पोलीस यंत्रणा आपल्यापर्यंत पोहोचू नये, याची काळजी घेण्यात आली होती.
बँकेचा व्यवस्थापकच मास्टरमाईंड…
विजयकुमार मिरियाल हा 9 मे पर्यंत कॅनरा बँकेच्या मनगुळी शाखेत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून सेवा बजावत होता. 9 मे रोजी त्याची रोनीहाळ शाखेत बदली झाली. बदली होण्यापूर्वीपासून त्याने चोरीची योजना बनवली होती. आपले साथीदार चंद्रशेखर व त्याचा मित्र सुनील व इतर काही गुन्हेगारांना एकत्र करून सातत्याने योजना तयार करण्यात आली होती. सर्व काही योजनेनुसारच घडवून शेवटी दागिने पळविण्यात आले होते. चंद्रशेखर हा रियल इस्टेट व्यावसायिक आहे. शिक्षण संस्थाही चालवतो. त्याला कॅसिनोचा नाद आहे. तर सुनील हा व्यवसायाने वाहनचालक असून त्यालाही कॅसिनोचा नाद आहे. या गुन्हेगारांनी सर्व दागिने वितळवून त्यांच्या लगडी बनविल्या होत्या.
इंग्लिश, हिंदी चित्रपट पाहून चोरीचा प्लॅन…ब्लॅक मॅजिकचा वापर
एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाणेच गुन्हेगारांनी ही चोरी केली आहे. यासाठी बँक दरोडे किंवा चोरीचे कथानक असलेले अनेक इंग्लिश, हिंदी चित्रपटही त्यांनी पाहिले आहेत. आपली वेशभूषा कशी असावी, पोलिसांना चकवण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी? याविषयी चित्रपटातून प्रेरणा घेण्यात आली आहे. केरळ व तामिळनाडूमधील बँक दरोडे किंवा चोरी प्रकरणांचाही अभ्यास करण्यात आला आहे. या दोन राज्यात गुन्ह्यापूर्वी काळ्या जादूचा प्रयोग करून दरोडा घातल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे या टोळीनेही काळ्या जादूचाही वापर केला आहे. याचा उद्देशच पोलिसांची दिशाभूल करणे हा होता. हळद-कुंकू, कापूर, लिंबू आदी साहित्य घटनास्थळी टाकण्यात आले होते. चोरी करणारी टोळी केरळ किंवा तामिळनाडूतील असावी, असा संशय निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश होता.









