चंदगडच्या वृद्ध शिक्षकाला लक्ष विचलित करून लुटले : चार तोळे दागिने लांबविले
बेळगाव : पोलीस असल्याची बतावणी करून चंदगड (जि. कोल्हापूर) येथील एका वृद्ध शिक्षकाच्या अंगावरील चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने भामट्यांनी पळविले आहेत. शुक्रवार दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी जुने बेळगाव परिसरात घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्यांपाठोपाठ लक्ष विचलित करून एकाकी वृद्धांना लुटण्याचे प्रकारही सुरू झाले आहेत. शुक्रवारी सकाळी 9 वाजता मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका वृद्ध शिक्षकाचे लक्ष विचलित करून त्यांच्या अंगावरील चेन, अंगठ्या असे चार तोळ्यांचे दागिने भामट्यांनी लांबविले आहेत. मूळचे चंदगड येथील मधुकर साळुंखे (वय 71) हे जुने बेळगावला आपल्या पाहुण्यांकडे आले होते. शुक्रवारी सकाळी बी. एस. येडियुराप्पा मार्गावर ते मॉर्निंग वॉकला गेले असता एका भामट्याने त्यांना गाठले. ‘पुढे चोरी झाली आहे, आपण पोलीस आहोत, तुमचे दागिने सांभाळा’, असा सल्ला देत त्यांच्या अंगावरील दागिने व मनगटी घड्याळ गोळा करून एका रुमालात बांधून त्यांच्या हातात ठेवले. थोड्या वेळानंतर त्या वृद्धाने रुमालाची गाठ सोडली असता सोन्याचे दागिने नसल्याचे आढळून आले. रुमालात केवळ घड्याळ होते. एक भामटा वृद्धाशी बोलत होता तर दुसरा मोटारसायकलवर होता. त्याने आपल्याजवळील 50 हजार रुपये दाखवत आपणही सुरक्षित ठेवत असल्याचे सांगितले होते. यावरून वृद्धाच्या अंगावरील दागिने लुटणारे भामटे दोघे असल्याचे समजते. यासंबंधीची माहिती मिळताच शहापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. भामट्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला आहे का? याची पडताळणी करण्यात येत होती. शुक्रवारी रात्री यासंबंधी शहापूर पोलिसांशी संपर्क साधला असता एफआयआर दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.









