वृत्तसंस्था/ ला नुसिया (स्पेन)
आयबीएच्या 2022 सालातील युवा पुरुष आणि महिलांच्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या स्पर्धकांनी तीन सुवर्णपदके मिळवली. पुरुष विभागात विश्वनाथ आणि वंशज यांनी तर महिलांच्या विभागात देविकाने भारताला सुवर्णपदके मिळवून दिली.
चेन्नईच्या विश्वनाथने पुरुषांच्या 48 किलो वजन गटातील अंतिम लढतीत फिलिपिन्सच्या सुयोमचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यानंतर पुरुषांच्या 63.5 किलो वजन गटातील अंतिम लढतीत भारताच्या युवा आशियाई चॅम्पियन वंशजने जॉर्जियाच्या देमूर केजियाचा 5-0 अशा गुणांनी फडशा पाडत आपल्या देशाला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. महिलांच्या 52 किलो वजन गटातील अंतिम लढतीत भारताच्या देविका घोरपडेने इंग्लंडच्या लॉरेन मॅकीचा 5-0 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक मिळवले. महिलांच्या 48 किलो वजन गटात उझ्बेकच्या गेनिव्हाने भारताच्या भावना शर्माचा 5-0 असा पराभव करत सुवर्णपदक मिळवले. भावना शर्माला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 54 किलो वजन गटात भारताच्या आशिषने रौप्यपदक पटकावले. आशिषला जपानच्या सेकाईकडून 4-1 अशी हार पत्करावी लागली.
स्पर्धेच्या पदकतक्त्यात भारत 11 पदकांसह आघाडीवर असून उझ्बेकने 10 पदकांसह दुसरे, आयर्लंडने 7 पदकांसह तिसरे तर कझाकस्तानने 7 पदकांसह चौथे स्थान मिळवले. या स्पर्धेमध्ये 73 देशांचे सुमारे 600 स्पर्धक सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत भारताच्या महिला स्पर्धकांनी इतर देशांच्या स्पर्धकांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे 8 पदके पटकावली आहेत. भारताच्या तमन्ना, कुंजाराणी देवी, मुस्कान आणि लाशु यादव यांनी प्रत्येकी एक कांस्यपदक घेतले आहे.









