वृत्तसंस्था/ बँकॉक
येथे सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या तजिंदरपालसिंग तूरने पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात तसेच पारुल चौधरीने महिलांच्या 3000 मी. स्टिपलचेस प्रकारात सुवर्णपदके मिळवली. या स्पर्धेत भारताने पाच सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कास्य अशी एकूण 9 पदके मिळवली आहेत.
भारताचा गोळाफेक धारक अॅथलिट तजिंदरपालसिंग तूरने गोळाफेक या प्रकारात दुसऱ्या प्रयत्नात 20.23 मी. चे अंतर नोंदवत सुवर्णपदक पटकावले. या क्रीडा प्रकारात इराणच्या साबेरी मेहदीने 19.98 मी. चे अंतर नोंदवत रौप्यपदक तर कझाकस्तानच्या इव्हान इव्हानोवने 19.87 मी. चे अंतर नोंदवत कास्यपदक मिळवले. महिलांच्या 3000 मी. स्टिपलचेसमध्ये भारताची महिला धावपटू पारुल चौधरीने 9 मिनिटे 38.76 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक मिळवले. प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील या क्रीडा प्रकारातील चौधरीचे हे पहिले सुवर्णपदक आहे. सदर स्पर्धेच्या पदक तक्त्यामध्ये भारताने आतापर्यंत पाच सुवर्णपदकांची कमाई केली आहे. गुरुवारी भारताने तीन सुवर्ण आणि दोन कास्यपदकांची कमाई केली. या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते 19 ते 27 ऑगस्ट दरम्यान हंगेरीतील बुडापेस्ट येथे होणाऱ्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी पात्र ठरू शकतील.
भारताच्या 28 वर्षीय तजिंदरपालसिंग तूरने आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतील पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात आपले सुवर्णपदक सलग दुसऱ्यांदा कायम राखले आहे. अशी कामगिरी करणारा तूर हा तिसरा गोळाफेक अॅथलिट आहे. यापूर्वी कतारी बिलाल साद मुबारकने 1995 तसेच 1998 साली सलग दोनवेळा अजिंक्यपदे मिळवली होती. आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत यापूर्वी भारताच्या सात अॅथलिट्सनी गोळाफेक प्रकारात आतापर्यंत सुवर्णपदके मिळवली आहेत. गेल्या महिन्यात भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत तूरने 21.77 मी. गोळाफेक करत नवा स्पर्धा विक्रम केल्याने तो बुडापेस्टमध्ये होणाऱ्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले आहे.
महिलांच्या 3000 मी. स्टिपलचेस प्रकारात भारताची महिला धावपटू 28 वर्षीय पारुल चौधरीने 9 मिनिटे 38.76 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक पटकावले. चालू वर्षाच्या प्रारंभी पारुल चौधरीसाठी अमेरिकेत प्रशिक्षण सराव शिबिराची व्यवस्था करण्यात आली होती. 2007 साली या स्पर्धेत पहिल्यांदा महिलांच्या 3000 मी. स्टिपलचेस प्रकाराचा समावेश करण्यात आला होता. बँकॉकमधील या स्पर्धेत चीनच्या झुने 9 मिनिटे 44.54 सेकंदाचा अवधी घेत रौप्य तर जपानच्या योशिमोरा रिमीने 9 मिनिटे 48.48 सेकंदाचा अवधीत कास्यपदक घेतले. 2013 आणि 2017 साली या क्रीडा प्रकारात भारताच्या सुधा सिंगने तर 2015 साली ललिता बाबरने सुवर्णपदके मिळवली होती.









