वृत्तसंस्था/ चेंगवॉन (दक्षिण कोरिया)
येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ कनिष्ठांच्या 2023 च्या विश्व चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत भारताचे नेमबाज शुभम बिस्ला आणि सैन्यम यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदके मिळविली.
या स्पर्धेत पदक तक्त्यात भारत 2 सुवर्णपदकांसह आघाडीवर आहे. या स्पर्धेमध्ये पिस्तुल, रायफल आणि शॉटगन अशा तीन विविध प्रकारात 21 वर्षाखालील वयोगटात भारताचे 90 नेमबाज सहभागी झाले आहेत. कनिष्ठ पातळीवरील ही तिसरी विश्व नेमबाजी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये यजमान कोरियाच्या 66 नेमबाजांनी आपला सहभाग दर्शविला आहे. तर अमेरिकेचे 43 नेमबाज या स्पर्धेत दाखल झाले आहेत. भारतीय नेमबाज संघामध्ये 16 वर्षीय दर्शना राठोडचा समावेश असून ती महिलांच्या टॅप नेमबाजी प्रकारात सहभागी होणार आहे. पेरुमध्ये यापूर्वी झालेल्या कनिष्ठांच्या विश्व नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने 17 सुवर्णपदकांसह एकूण 43 पदकांची कमाई करुन आघाडीचे स्थान मिळविले होते. पेरुतील झालेल्या स्पर्धेत रेझा धीलाँ, विनय प्रतापसिंग चंद्रावत, मोहम्मद मुझाहिद मलिक, नम्या कपूर, यांनी पेरुतील नेमबाजी स्पर्धेत दर्जेदार कामगिरी केली होती. हे सर्व नेमबाज चेंगवॉन स्पर्धेतही सहभागी झाले आहेत.