वृत्तसंस्था/ अमन (जॉर्डन)
आशियाई पुरुष आणि महिलांच्या मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या चार महिला मुष्टीयोद्धय़ांनी सुवर्णपदके पटकाविली. लवलिना बोर्गोहेन, परवीन हुडा, सविती आणि अल्फिया खान यांनी शानदार कामगिरी करत भारताला चार सुवर्णपदके मिळवून दिली.

शुक्रवारी या स्पर्धेत महिलांच्या विभागात 63 किलो वजन गटात भारताची विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेतील कास्यपदक विजेती परवीन हुडाने अंतिम लढतीत जपानच्या किटो मेईचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच 75 किलो वजन गटात खेळणारी भारताची ऑलिम्पिक कास्यपदक विजेती लवलिना बोर्गोहेन हिने अंतिम लढतीत उझ्बेकच्या रुझमेटोव्हा सोकिबाचा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यानंतर सवितीने 81 किलो वजन गटात तर अल्फिया खानने 81 किलो वरील वजन गटात अंतिम लढतीत आपल्या जबरदस्त ठोशाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत भारताला आणखी दोन सुवर्णपदके मिळवून दिली. सवितीने अंतिम लढतीत कजाकस्तानच्या गुलसेया येरझेनचा तर अल्फिया पठाणने जॉर्डनच्या इस्लाम हुसालीचा पराभव केला. या स्पर्धेत महिलांच्या 52 किलो वजन गटात भारताच्या मिनाक्षीने रौप्यपदक मिळवले. भारतीय महिला स्पर्धकांनी या स्पर्धेत एकूण सात पदकांची कमाई केली आहे. लवलिनाचे आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेतील हे तिसरे पदक आहे. 2017 साली तिने या स्पर्धेत कास्य तर 2021 साली तिने या स्पर्धेत वेल्टरवेट गटात आणखी एक पदक मिळवले होते. त्याचप्रमाणे 63 किलो वजन गटात भारताच्या परवीन हुडाची कामगिरी दर्जेदार झाली. तिने यापुर्वी विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत कास्यपदक मिळवले होते. त्यानंतर तिला राष्ट्रकुल स्पर्धा हुकली होती. महिलांच्या 52 किलो फ्लायवेट गटातील सुवर्णपदकासाठीच्या लढतीत जपानच्या किनोशिता रिंकाने भारताच्या मिनाक्षीचा 4-1 असा पराभव करत सुवर्णपदक मिळवले. मिनाक्षीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेत पुरुष विभागात शनिवारी भारताच्या शिवा थापाचा सुवर्णपदकासाठी सामना होणार आहे. शिवा थापा आणि उझ्बेकचा रुसलेन अब्दुलेव यांच्यात ही अंतिम लढत होणार आहे. 2013 साली या स्पर्धेत शिवा थापाने सुवर्णपदक मिळवले होते. तसेच त्याने 2015 आणि 2019 साली कास्यपदके आणि 2017 व 2021 साली या स्पर्धेत रौप्यपदके पटकाविली होती. आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत आतापर्यंत शिवा थापाने पाच पदकांची कमाई केली असून आता तो विक्रमी सहावे पदक मिळवणार आहे. 2005 साली या स्पर्धेत भारताने 7 सुवर्णपदके तर 2003 साली भारताने 4 सुवर्णासह एकूण पाच पदकांची कमाई केली होती.









