वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे झालेल्या 2022 च्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताच्या महिला मल्ल सरिता मोर आणि संगीता फोगट यांनी आपल्या वजन गटात सुवर्णपदके पटकावली. सदर स्पर्धा येथील राजीव गांधी इनडोअर स्टेडियममध्ये तीन दिवस चालली होती.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारा मल्ल बजरंग पुनियाची पत्नी संगीता फोगटने 62 किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवताना दिल्लीची मल्ल सुमित्राचा पराभव केला. 59 किलो फ्रीस्टाईल वजन गटात सरिता मोरने सिमरनचा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. विश्व कुस्ती स्पर्धेत सरिता मोरने कास्यपदक मिळवले होते. संगीता फोगटने तब्बल सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर कुस्ती आखाडय़ात प्रवेश केला होता.
पुरुषांच्या विभागात 57 किलो वजन गटात अमन शेरावतने हरियाणाच्या उदितचा पराभव करत सुवर्णपदक मिळवले. पुरुषांच्या 97 किलो वजन गटात पंजाबच्या साहिलने सत्यवर्त कडियानचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. सत्यवर्त कडियानने आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत पदके मिळवली होती. 74 किलो वजन गटात सागर जगलेनने नरसिंग यादवचा पराभव करत वरिष्ठ गटात पहिले सुवर्णपदक पटकावले. ग्रीको रोमन पद्धतीमध्ये 60 किलो वजन गटात ज्ञानेंद्रने विक्रमचा पराभव करत सुवर्णपदक घेतले. या स्पर्धेत अंकित गुलियाने 72 किलो गटात, नवीनने 130 किलो गटात, साजन बनवालाने 77 किलो तर रोहित दाहियाने 82 किलो गटात सुवर्णपदके मिळवली. या स्पर्धेमध्ये भारताचे अव्वल मल्ल बजंरग पुनिया, रवीकुमार दाहिया, विनेश फोगट, साक्षी मलिक, दीपक पुनिया, अंतिम पांघल सहभागी झाले नाहीत.









