वृत्तसंस्था/ अॅस्टेना (कझाकस्तान)
शनिवारी येथे झालेल्या इलोर्डा चषक आंतरराष्ट्रीय पुरूष आणि महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय स्पर्धकांनी दर्जेदार कामगिरी करताना एकूण 12 पदकांची लयलूट केली. भारताची विद्यमान विश्वविजेती निखात झरीन तसेच मिनाक्षी यांनी आपल्या वजन गटात सुवर्णपदकांची कमाई केली. यापूर्वी झालेल्या इलोर्डा चषक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताने केवळ पाच पदके मिळविली होती.
महिलांच्या 52 किलो वजन गटात निखात झरीनने अंतिम लढतीत कझाकस्तानच्या झेजीरा युरेकबायेव्हाचा 5-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक हस्तगत केले. तर महिलांच्या 48 किलो वजन गटातील अंतिम लढतीत मिनाक्षीने उझ्बेकचा रेमोनोव्हा सेडॉनचा 4-1 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक मिळविले. महिलांच्या 50 किलो वजन गटात अनामिका तसेच 60 किलो वजन गटात मनिषा यांना अंतिम लढतीत हार पत्करावी लागल्याने त्यांना प्रत्येकी एक रौप्यपदक मिळाले. आशियाई विजेती तसेच विद्यमान विश्व विजेती चीनच्या वू हिने अनामिकाचा 4-1 तर कझाकस्तानच्या व्हिक्टोरिया ग्रेफेव्हाने मनिषाचा 5-0 असा पराभव करत सुवर्णपदक मिळविले.
या स्पर्धेत भारताच्या मिनाक्षी आणि निखात झरीन यांनी सुवर्णपदके, अनामिका व मनिषा यांनी रौप्यपदके, पुरूषांच्या विभागात 48 किलो गटात सोई बामने, 67 किलो गटात अभिषेक यादवने, 86 किलो गटात विशालने, 92 किलोवरील वजन गटात गौरव चौहानने, महिलांच्या विभागात सोनूने 63 किलो गटात, मंजू बंबोरियाने 66 किलो गटात, शलाका सिंगने 70 किलो गटात आणि मोनिकाने 81 किलोवरील गटात प्रत्येकी एक कास्यपदक पटकाविले.









