वृत्तसंस्था/नवी दिल्ली
टोकियोमध्ये नुकत्याच झालेल्या हुलीक देहासू जपान खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने सुवर्णपदक पटकाविले. यापूर्वी प्रमोदने पॅरा आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते.
जपानमध्ये झालेल्या या स्पर्धेतील एसएल 3 बॅडमिंटन एकेरीच्या विभागातील अंतिम सामन्यात रविवारी प्रमोद भगतने भारताच्या मनोज सरकारचा 21-16, 21-19 अशा गेम्समध्ये केवळ 38 मिनिटात पराभव करत सुवर्णपदकाला गवसनी घातली. मात्र या स्पर्धेतील मिश्र दुहेरीत प्रमोद भगत आणि मनिषा रामदास यांना चीनच्या यांग आणि झिया यांच्याकडून हार पत्करावी लागली. सदर स्पर्धेमध्ये भारताच्या नेहल गुप्ता आणि नवीन शिवकुमार यांनी पुरूष दुहेरी एसएल 3 – एसएल 4 गटात पुरूष दुहेरीत सुवर्णपदक मिळविताना भारताच्या दीपरंजन आणि मनोज सरकार यांचा पराभव केला. महिलांच्या एसएल 3 प्रकारात एकेरीत भारताच्या मनिषा जोशीने कांस्यपदक मिळविले.









