वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
येथे सुरू असलेल्या 2023 च्या राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठांच्या अॅथलेटिक्स स्पर्धेत रविवारी दुसऱ्या दिवशी मिरजच्या 28 वर्षीय पारुल चौधरीने महिलांच्या 3000 मी. स्टिपलचेसमध्ये सुवर्णपदक मिळवून आगामी आशियाई स्पर्धेचे तिकीट आरक्षित केले आहे.
महिलांच्या 3000 मी. स्टिपलचेस प्रकारात पारुल चौधरीने 9 मिनिटे 34.23 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदकासह पहिले स्थान मिळवत नवा स्पर्धा विक्रम केला. या क्रीडा प्रकारात 2018 साली गौहत्तीमध्ये सुधा सिंगने नोंदवलेला 9 मिनिटे 39.59 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम पारुल चौधरीने मोडीत काडला. आगामी होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी पारुलने या क्रीडा प्रकाराते आपली पात्रता सिद्ध केली आहे. गेल्या महिन्यात लॉस एंजिल्स येथे झालेल्या ग्रा प्रि अॅथलेटिक्स स्पर्धेत पारुल चौधरीने या क्रीडा प्रकारात आपली सर्वोत्तम कामगिरी (9 मिनिटे 29.51 सेकंद) कामगिरी नोंदवली होती. ओदिशामध्ये सध्या उष्णतेची लाट आली असून खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी दमछाक करावी लागत आहे. बऱ्याच खेळाडूंना येथील उष्णतेचा बराच त्रास झाला असून काही खेळाडूंच्या नाकातून रक्तस्त्रावही झाला आहे.









