वृत्तसंस्था/ बर्न (स्वीस)
येथे झालेल्या सिटीयुस आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा पुरुष अॅथलिट्स जस्वीन अल्ड्रीनने लांब उडी या प्रकारात 8.22 मीटरची नोंद करत सुवर्णपदक पटकावले. अल्ड्रीनच्या वैयक्तिक अॅथलेटिक्स कारकीर्दीतील ही चौथ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी आहे.
21 वर्षीय जस्वीनने 2023 च्या अॅथलेटिक्स हंगामात 2 मार्च रोजी बळ्ळारी येथे झालेल्या राष्ट्रीय खुल्या उंच उडी स्पर्धेत 8.42 मीटरची नोंद केली होती त्याची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यानंतर मे महिन्यात क्युबातील हवाना येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने दोनवेळा 8 मी. पेक्षा अधिक अंतर नोंदवले. गेल्या जून महिन्यात भुवनेश्वरमध्ये झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य अॅथलेटिक्स स्पर्धेत जस्वीन अल्ड्रीनने लांब उडी प्रकारात 7.98 मी. चे अंतर नोंदवत रौप्यपदक मिळवताना त्याने हंगेरीतील बुडापेस्ट येथे 19 ते 27 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली होती. गेल्या महिन्यात झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप अॅथलेटिक्स स्पर्धेत तंदुरुस्तीच्या समस्येमुळे अल्ड्रीन सहभागी झाला नव्हता.









