वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
येथे सुरू असलेल्या आंतरराज्य राष्ट्रीय चॅम्पियनशिप अॅथलेटिक्स स्पर्धेत हरियाणाच्या अंजली देवीने महिलांच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीत वैयक्तिक सर्वोत्तम जलद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. दरम्यान या स्पर्धेत ओदिशा राज्यातील उष्ण तापमानामुळे अॅथलिट्सची दमछाक झाली आहे. भुवनेश्वरचे तापमान 44 डिग्रीपेक्षा अधिक असल्याने अनेक खेळाडूंना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे.
या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी डेकेथलॉन प्रकारात सहभागी होणाऱ्या तेजस्वीन शंकरच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाल्याने त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. स्टिपलचेसमध्ये सुवर्णपदक विजेत्या बालकिशनलाही या उष्णतेचा चांगलाच तडाखा बसला आहे. ओदिशा राज्याला या उष्ण हवामानाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सदर स्पर्धा आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र फेरीची असल्याने सहभागी झालेल्या अॅथलिट्सवर साहजिकच अधिक दडपण आले आहे पण प्रतिकूल हवामानामुळे अनेक खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारात समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. या स्पर्धेमध्ये तामिळनाडूचा शिबाकुमार आणि आंध्रप्रदेशची ज्योती येराजी वेगवान धावपटू ठरले आहेत.
महिलांच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीत हरियाणाच्या 24 वर्षीय अंजली देवीने 51.58 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक पटकावले. हरियाणाच्या हेमाशी मलिकने 51.76 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक मिळवले आहे. अंजलीने या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवले पण तिला आशियाई स्पर्धेसाठीची पात्रता मर्यादा गाठता आली नाही. पुरुषांच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीत कलिंगा कुमारगेने 45.64 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक मिळवले. केरळच्या मोहमद अनासने या क्रीडा प्रकारात रौप्यपदक तसेच केरळच्या मोहमद अजमलने कास्यपदक पटकावले. या स्पर्धेमध्ये तामिळनाडूचा धावपटू बी. शिबाकुमार हा सर्वात वेगवान धावपटू ठरला. पुरुषांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत त्याने 10.37 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक, पंजाबच्या हरजित सिंगने 10.45 सेकंदाचा अवधी घेत रौप्य आणि तामिळनाडूच्या के. इलाकीडेसनने कास्यपदक मिळवले. आंध्रप्रदेशच्या ज्योती येराजीने 100 मी. अडथळ्याच्या शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम करत सुवर्णपदक मिळवले. तसेच ती या स्पर्धेतील महिलांच्या विभागात सर्वात वेगवान धावपटू ठरली आहे. ज्योती येराजीने महिलांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत 11.46 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत ज्योतीचे हे दुसरे सुवर्णपदक आहे.









