वृत्तसंस्था /अमान (जॉर्डन)
येथे सुरू असलेल्या 20 वर्षाखालील वयोगटाच्या पुरुष आणि महिलांच्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत महिलांच्या विभागात भारताच्या प्रिया मलिकने 76 किलो वजनगटात सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेच्या इतिहासात सुवर्णपदक मिळवणारी प्रिया मलिक ही दुसरी भारतीय महिला मल्ल आहे.
महिलांच्या 76 किलो वजनगटातील अंतिम लढतीत प्रिया मलिकने जर्मनीच्या लॉरा कुहेनचा 5-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. यापूर्वी झालेल्या 20 वर्षाखालील वयोगटाच्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या अंतिम पांगलने सुवर्णपदक मिळवले होते. केंद्रीय क्रीडा खात्याच्या टॉप्स योजना अंतर्गत निवडण्यात आलेल्या प्रिया मलिक आणि अंतिम पांगल या दोन्ही महिला मल्लांनी दर्जेदार कामगिरी करत आपल्या देशाला या स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळवून दिली आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात यापूर्वी म्हणजे 2001 साली भारतीय मल्लांनी अशी कामगिरी पहिल्यांदा केली होती.
अमानमधील सुरू असलेल्या या स्पर्धेत खेलो इंडियाची अॅथलिट अरजूने 68 वजन किलो गटात कास्यपदक मिळवताना तुर्कीच्या इलिफ कुर्टचा पराभव केला.गेल्या बुधवारी या स्पर्धेत पुरुषांच्या विभागात भारताच्या मोहित कुमारने 61 किलो वजनगटात फ्रिस्टाईल प्रकारात सुवर्णपदक मिळवले होते. कनिष्ठांच्या विश्व चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत पुरुष विभागात फ्रिस्टाईल प्रकारात पदक मिळवणारा मोहित कुमार हा चौथा मल्ल आहे. त्याचप्रमाणे पुरुषांच्या 79 किलो वजनगटातील फ्रिस्टाईल प्रकारात सागर जगलनने रौप्यपदक तर 97 किलो वजन गटात भारताच्या दीपक चहलने कास्यपदक मिळवले. पुरुषांच्या 74 किलो वजनगटात फ्रिस्टाईल प्रकारात जयदीपने कास्यपदक, 125 किलो वजनगटात फ्रिस्टाईलमध्ये भारताच्या रजत रुहेलने कास्यपदक मिळवले. पुरुषांच्या विभागात या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा मोहित कुमार हा चौथा भारतीय मल्ल ठरला आहे. यापूर्वी म्हणजे 2001 साली पलविंदर चिमाने, रमेशकुमारने तसेच 2019 साली दीपक पुनियाने सुवर्णपदके मिळवली होती. अमानमधील सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताने आतापर्यंत सात पदकांची कमाई केली असून त्यात दोन सुवर्ण, एक रौप्य आणि 4 कास्यपदकांचा समावेश आहे.









