वृत्तसंस्था/ बेंगळूर
2023 च्या इंडियन ग्रा प्रि 4 अॅथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या लांब उडी या प्रकारात कर्नाटकाची 19 वर्षीय शायली सिंगने सुवर्णपदक पटकावताना 6.76 मीटरचे अंतर नोंदवले. महिलांच्या या क्रीडाप्रकारात माजी महिला अॅथलिट अंजू बॉबी जॉर्जनंतर सर्वोत्तम कामगिरी करणारी शायली सिंग ही दुसरी महिला अॅथलिट्स आहे.
आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी लांब उडी या प्रकारासाठी ही मर्यादा शायली सिंगने ओलांडली आहे. आता शायली सिंग चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करेल. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी अखिल भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनने पात्रतेची मर्यादा 6.45 मी. अशी ठेवली होती. शायली सिंगने आपल्या वैयक्तिक अॅथलेटिक्स कारकीर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी केली आहे. शायली सिंगने ऐश्वर्या बाबूचा 6.73 मी., जे. जे. शोभा आणि व्ही. निना यांचा 6.66 मी. चा, मयुका जोहनूचा 6.64 मी. चा तसेच एम. प्रजुषा, नैना जेम्स आणि अॅन्सी सोजन यांचा 6.65 मी. चा विक्रम मागे टाकला आहे. मात्र, तिला अंजू बॉबी जॉर्जचा विक्रम मागे टाकता आला नाही. अंजू जॉर्जने या क्रीडा प्रकारात नोंदवलेला 6.83 मी. चा विक्रम अद्याप अबाधित राहिला आहे. बेंगळूरच्या या स्पर्धेमध्ये नैना जेम्सने 6.53 मी. चे अंतर नोंदवत रौप्यपदक घेतले.
महिलांच्या गोळाफेकमध्ये मनप्रित कौरने 16.81 मी. चे अंतर नोंदवत सुवर्णपदक पटकावले. मनप्रित कौरने रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत आपला सहभाग दर्शवला होता. महिलांच्या पोल व्हॉल्टमध्ये तामिळनाडूच्या बॅरेनिका इलेनगोव्हेनने सुवर्णपदक घेताना 4.10 मी. चे अंतर नोंदवले. पुरुषांच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीत अमोज जेकॉबने 46.13 सेकंदाचा अवधी नोंदवत सुवर्णपदक नोंदवले. आसामच्या अमलान बोर्गोहेनने 100 आणि 200 मी. धावण्याच्या शर्यतीत अनुक्रमे 10.53 व 20.78 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदके पटकावली. ज्योती येराजीने महिलांच्या 100 मी. अडथळ्याच्या शर्यतीत तसेच महिलांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवली. पुरुषांच्या भालाफेकीतील सुवर्णपदक डी. पी. मनूने पटकावताना 84.33 मी. ची नोंद केली. रोहित यादवने रौप्य तर शिवपाल सिंगने कास्यपदक मिळवले. पुरुषांच्या गोळाफेकमध्ये भारताचा ऑलिम्पिक अॅथलिट्स तेजिंदर पाल सिंगने सुवर्णपदक मिळवले. या चौथ्या ग्रा प्रि अॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांसाठी 11 तर महिलांसाठी 10 असे एकूण 21 क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.









