वृत्तसंस्था/बँकॉक
येथे झालेल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये यू-22 विभागात भारताच्या रितिकाने सुवर्णपदक पटकावले तर भारताला या विभागात चौथे स्थान मिळाले. भारताच्या यू-22 पथकाने एकूण 13 पदके मिळवित स्पर्धेची सांगता केली. त्याआधी यू-19 पथकाने 14 पदेक पटकावली होती. त्यांच्या या कामगिरीमुळे भारताला दुसरे स्थान मिळाले. यू-22 विभागात भारताला एकमेव सुवर्ण रितिकाने महिलांच्या 80 किलोवरील गटात मिळवून दिले. अंतिम फेरीत दबाव असूनही तिने समतोल ढळू न देता तिने कझाकच्या आसेल तोक्तासीनचा पराभव केला. बलाढ्या प्रतिस्पर्धीविरुद्ध रितिकाने सावधपणे आक्रमक धोरण अवलंबत काही जबरदस्त ठोसे लगावले आणि भारताला या स्पर्धेतील चौथे सुवर्ण मिळवून दिले.
सकाळच्या सत्रात यात्री पटेलला महिलांच्या 57 किलो वजन गटात उझ्बेकच्या खुमोराबोनू ममाजोनोव्हाकडून पराभव स्वीकारावा लागल्याने तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले तर 60 किलो वजन गटात प्रियालाही रौप्यपदक मिळाले. अंतिम फेरीत तिला चीनच्या यु तियानकडून 2-3 असा निसटता पराभव स्वीकारावा लागला. नंतर पुरुषांच्या 75 किलो वजन गटाच्या अंतिम लढतीत नीरजलाही उझ्बेकच्या शावकातजोन बोल्टाएव्हनेही हरविले तर इशान कटारियाला उझ्बेकच्याच खलिमजॉन ममासोलिएव्हने 90 किलोवरील वजन गटाच्या लढतीत हरवून सुवर्ण मिळविले.









