वृत्तसंस्था /भुवनेश्वर
गुरुवारपासून येथे सुरू झालेल्या आंतरराज्य राष्ट्रीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत उत्तरप्रदेशचा धावपटू 24 वर्षीय कार्तिक कुमारने पुरुषांच्या 10 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने या क्रीडा प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीची पात्रता मर्यादा पार करत सुवर्णपदक मिळवले.या क्रीडा प्रकारात कार्तिक कुमारने 29 मिनिटे, 01.84 सेकंदाचा अवधी घेतला. तसेच 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान चीनमधील हांगझोयु येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीची 29.30 ही मर्यादा कार्तिकने पार केली. आता 24 वर्षीय कार्तिकची वरिष्ठ पातळीवरील पहिली स्पर्धा हांगझोयुमधील आशियाई क्रीडा स्पर्धा राहिल. 2018 साली झालेल्या 20 वर्षाखालील वयोगटाच्या आशियाई चॅम्पियशिप स्पर्धेत कार्तिकने कांस्यपदक मिळवले होते. भुवनेश्वरमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या 10 हजार धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगने 29 मिनिटे 03.78 सेकंदाचा अवधी घेत दुसरे स्थान पटकावले. तर दिल्लीच्या प्रीतम कुमारने तिसरे आणि मध्यप्रदेशच्या हरमनज्योत सिंगने चौथे स्थान मिळवले. महिलांच्या 10 हजार मी. शर्यतीत हिमाचल प्रदेशच्या सीमाने महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवला मागे टाकत सुवर्णपदक पटकावले. सीमाने 34 मिनिटे 20.01 सेकंदाचा अवधी घेतला. पुरुषांच्या 20 कि.मी. चालण्याच्या शर्यतीत संदीपकुमारने 1 तास 27 मिनिटे आणि 12 सेकंदाचा अवधी घेत सुवर्ण तर महिलांच्या 20 कि.मी. चालण्याच्या शर्यतीत भावना जाटने 1 तास 37 मिनिटे 03.00 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक मिळवताना नवा स्पर्धाविक्रम केला.









