वृत्तसंस्था/ बाकू (अझरबेजान)
आयएसएसएफच्या विश्व चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत शुक्रवारी 10 मी. एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताने सुवर्णपदक पटकावले. भारतीय नेमबाज इशा सिंग आणि शिवा नरवाल यांनी दर्जेदार कामगिरी करत या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक हस्तगत केले. या स्पर्धेमध्ये भारताने आतापर्यंत दोन पदकांची कमाई केली असून पदकतक्त्यात भारत दुसऱ्या स्थानावर आहे.
10 मी. एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजीच्या सुवर्णपदकासाठीच्या लढतीत इशा सिंग आणि शिवा नरवाल तुर्कीच्या इलियादा तेरान आणि युसुफ डिकेक यांचा 16-10 अशा गुणांनी पराभव केला. या स्पर्धेमध्ये चीनने पदकतक्त्यात मुसंडी मारली असून त्यांनी 5 सुवर्ण आणि दोन कास्यपदके मिळवली आहेत. भारताच्या महिला नेमबाजांना मात्र सांघिक स्किट नेमबाजी प्रकारात दर्जेदार कामगिरी करता आली नाही. त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. चीनच्या हुवांग युटींग आणि शेंग लिहावो यांनी एअर रायफल मिश्र सांघिक 10 मी. प्रकारात सुवर्णपदक पटकावताना 632.7 गुणांची नोंद केली. या क्रीडा प्रकारात इराणने रौप्यपदक तर फ्रान्सने कास्यपदक मिळवले. महिलांच्या स्कीट सांघिक नेमबाजीत भारताच्या नेमबाजांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या क्रीडा प्रकारात अमेरिकेने सुवर्ण, इटलीने रौप्य तर स्लोव्हाकियाने कास्यपदक मिळवले.