वृत्तसंस्था/ लिमरीक (आर्यलंड)
येथे सुरु असलेल्या विश्व युवा तिरंदाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा 19 वर्षीय तिरंदाजपटू पार्थ साळुंखेने पुरुषांच्या रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत भारताने सर्वाधिक म्हणजे 11 पदकांची कमाई केली. तिरंदाजीच्या रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक मिळविणारा पार्थ साळुंखे हा पहिला भारतीय तिरंदाजपूट आहे.
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वास्तव्य असलेल्या 19 वर्षीय पार्थ साळुंखेने या स्पर्धेत 21 वर्षाखालील पुरुषांच्या रिकर्व्ह वैयक्तिक प्रकारात कोरीयाच्या सातव्या मानांकित साँग इनजूनचा 7-3 (26-26, 25-28, 28-26, 29-26, 28-26) असा पराभव केला. ही अंतिम लढत पाच सेट्समध्ये रंगली. या स्पर्धेमध्ये महिलांच्या 21 वर्षाखालील वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात भारताच्या भाजा कौरने कांस्यपदक मिळविताना चीन तैपेईच्या सु हेसीन यू हिचा 7-1 (28-25, 27-27, 29-25, 30-26) असा पराभव केला.
या स्पर्धेच्या पदक तक्त्यांत भारताने पहिले स्थान मिळविताना 6 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कांस्य अशी एकूण 11 पदकांची कमाई केली. मात्र या स्पर्धेत मानांकनाच्या दृष्टीकोनातून भारताला दुसरे स्थान मिळाले. कोरीयाने या स्पर्धेत पोल पोझिशन मिळविताना 6 सुवर्ण आणि 4 रौप्यपदके मिळविली. भारतीय नेमबाज पार्थ साळुंखेचे वडील शिक्षक असून पार्थला प्रमुख प्रशिक्षक प्रवीण सावंत यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सोनिपतच्या साई केंद्रामध्ये राम अवदेश यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
महिलांच्या रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात भारताच्या दीपिका कुमारीने 2009 साली कॅडेड गटात विश्व चॅम्पियन तर 2011 साली युवा गटात पुन्हा विश्व चॅम्पियनचा किताब मिळविला होता. त्यानंतर झारखंडच्या कोमालिका बारीने 2019 साली आणि 2021 साली पुन्हा असा पराक्रम केला होता. विश्व तिरंदाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत युवा गटात कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात विजेतेपद मिळविणारा पार्थ साळुंखे हा भारताचा सहावा तिरंदाजपटू आहे. 2006 साली भारताच्या पी. हंसदाने तसेच आदिती स्वामी आणि प्रियांश यांनीही रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात विश्व विजेतेपद मिळविले आहे. गेल्या जून महिन्यात सिंगापूर येथे झालेल्या आशिया चषक तिसऱ्या टप्प्यातील तिरंदाजी स्पर्धेत साळुंखेने रौप्यपदक मिळविले होते. तसेच गेल्या वर्षी साळुंखेने 2 कांस्यपदके पटकाविली होती.









