वृत्तसंस्था /झाग्रेब
येथे सुरू असलेल्या झाग्रेब खुल्या मानांकन मालिका आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताच्या अमन सेहरावतने चीनच्या जागतिक सातव्या मानांकित वानहाओ झोयुचा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. विश्व कुस्ती फेडरेशनच्या या स्पर्धेत भारतीय मल्ल विश्व कुस्ती फेडरेशनच्या बॅनरखाली आपला सहभाग दर्शवित आहेत. कारण नव्याने स्थापन करण्यात आलेली अखिल भारतीय कुस्ती फेडरेशन क्रीडा मंत्रालयाने बरखास्त केली असल्याने भारतीय मल्लांना विश्व कुस्ती फेडरेशनच्या बॅनरचा वापर करावा लागला. भारताच्या अमन सेहरावतने चीनच्या सातव्या मानांकित वेनहेओ झोयुचा 10-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत भारताच्या 13 व्या मानांकित अमन सेहरावतने सलामीच्या लढतीत तुर्कीच्या मोहम्मद केराबुसचा 15-4 असा पराभव करत पुढील फेरी गाठली होती. गेल्या वर्षी झालेल्या हाँगझाऊ स्पर्धेत 57 किलो वजन गटात अमन सेहरावतने कांस्यपदक मिळविले होते. झाग्रेब स्पर्धेत अमनने अमेरिकेच्या 19 व्या मानांकित रिर्चडस ऱ्होडसचा 11-0 अशा तांत्रिक गुणावर पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य लढतीत अमनने जॉर्जीयाच्या रॉबर्टी डींगसेव्हेलिवर 11-0 अशी मात करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. झाग्रेब स्पर्धेत भारताचा मल्ल दिपक पुनिया याला 86 किलो वजन गटात पदक फेरी गाठता आली नाही. त्याला या वजन गटातील पहिल्याच फेरीत कझाकस्तानच्या अझमतकडून पराभव पत्करावा लागला होता.









