वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जॉर्डनमधील अम्मान येथे सुरु असलेल्या 2022 च्या एएसबीसी आशियाई इलाईट पुरुष आणि महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत विविध वजन गटात भारताचे एकूण 14 मुष्टीयोद्धे अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या मोहिमेचे नेतृत्व लवलिना बोरोगेन आणि शिवा थापा यांच्याकडे राहिल.
बुधवारी उशिरा महिला विभागातील विविध वजन गटाच्या उपांत्य लढतींना प्रारंभ होईल. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कास्यपदक मिळवणाऱया लवलिनाने या स्पर्धेत 75 किलो गटात उपांत्य फेरी गाठली आहे. तिचा उपांत्य फेरीचा सामना प्रजासत्ताक कोरियाच्या सेआँग सुयेन बरोबर होणार आहे. 63 किलो गटात परवीन, 57 किलो गटात प्रिती, 81 किलोवरील गटात अल्फिया पठाण, 81 किलो गटात स्वीटी, 75 किलो गटात अनुक्षिता बोरो आणि 52 किलो गटात मिनाक्षी यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. पुरुषांच्या विभागात 63 किलो गटात शिवा थापा 57 किलो गटात मोहमद हुसामुद्दीन, 92 किलोवरील गटात नरेंद्र, 75 किलो गटात सुमित, 48 किलो गटात कुमार साहनी यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. शुक्रवारी महिला विभागातील अंतिम लढती होतील.









