वृत्तसंस्था/ शीमकेंट, कझाकस्तान
येथे सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत भारताच्या इलावेनिल वलरिवनने सुवर्णपदक पटकावले.
तामिळनाडूच्या 26 वर्षीय इलावेनिलने अंतिम फेरीत संयमी खेळ करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. याआधी तिने वर्ल्ड कप स्पर्धांमध्येही अनेकदा सुवर्णपदके मिळविली आहेत. येथे तिने अंतिम फेरीत 253.6 गुण नोंदवत पहिले स्थान घेतले. या काँटिनेन्टल स्पर्धेतील तिचे हे दुसरे सुवर्ण आहे. याआधी तिने 2019 मध्ये तैवानमध्ये झालेल्या स्पर्धेत पहिले सुवर्ण जिंकले होते. चीनच्या झिनलू पेंगने 253 गुण घेत रौप्य व कोरियाच्या यूनजी क्वॉनने 231.2 गुण घेत कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेत इलावेनिलने मिळविलेले हे पहिले वैयक्तिक पदक आहे. याआधी तिने सांघिक गटात एक रौप्य व एक कांस्य मिळविलेले आहे.
आणखी एक भारतीय नेमबाज मेहुली घोषला मात्र चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तिने 208.9 गुण मिळविले. अंतिम फेरीसाठी एकूण आठ नेमबाज पात्र ठरले होते. पात्रता फेरीत इलावेनिलने 630.7 गुण घेत आठवे स्थान मिळविले होते. मेहुलीने घोषने 630.3 गुण घेत दहावे स्थान मिळविल्याने ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरली नव्हती. पण आर्या बोरसे (633.2) व सोनम मस्कर (630.5) या दोन भारतीय नेमबाजांन फक्त मानांकन गुणांसाठी स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांनी माघार घेतल्याने मेहुली घोषला अंतिम फेरीत स्थान देण्यात आले.
वरिष्ठ विभागात भारताला मिळालेले हे वैयक्तिक दुसरे सुवर्ण आहे. भारताने पदकतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले असून कनिष्ठ नेमबाजांनी केलेल्या कामगिरीमुळे हे यश मिळाले आहे. अनंतजीत सिंग नरुकाने वरिष्ठांच्या स्कीट गटात पहिले सुवर्ण मिळविले तर ऑलिम्पिकपदकविजेत्या मनू भाकरने महिलांच्या 10 मी. एअर पिस्तूल प्रकारात कांस्य मिळविले. कनिष्ठ गटात शांभवी श्रावण, हृदया श्री कोंडुर, इशा अनिल यांनी कनिष्ठांच्या 10 मी. एअर रायफलमध्ये 1896.2 गुण घेत सांघिक सुवर्ण मिळविताना कनिष्ठ वर्ल्ड व आशिया स्पर्धेतील नवा विक्रम आहे. चीन व दक्षिण कोरियाच्यया नेमबाजांनी रौप्य व कांस्य मिळविले.









