वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली
आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण मिळविणारी सिफ्त कौर सामराने येथे सुरू असलेल्या 66 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 50 मी. रायफल प्रोन प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
भारताची नंबर वन 3 पी महिला नेमबाज असणारा सामराने 627.3 गुण नोंदवत पहिले स्थान पटकावले. ओडिशाच्या श्रीयांका सदनगीने 624.7 गुणांसह रौप्य व राजस्थानच्या मानिनी कौशिकने कांस्यपदक मिळविले. सामराने अंजुम मोदगिल व वंशिका साही यांच्यासमवेत सांघिक प्रकारातही पंजाबसाठी सुवर्ण मिळवून दिले. याच प्रकारात सिव्हिलियन व ज्युनियर विभागात मध्यप्रदेशच्या बांधवी सिंग व हरियाणाच्या निश्चल सिंग यांनी जेतेपद पटकावले.
एकाच वेळी सुरू असलेल्या पॅरा राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये हरियाणाच्या दीपक सैनीने 50 मी. रायफल प्रोन मिश्र (एसएच 1) वरिष्ठ गटाचे जेतेपद पटकावताना 602.7 गुण नोंदवले. दिल्लीच्या नरेश कुमार शर्माने 598.2 गुण नेंदवत रौप्य तर महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकरने 592.3 गुण नेंदवत कांस्य मिळविले.
भोपाळमध्ये घेण्यात येत असलेल्या पुरुषांच्या 25 मी. पिस्तुल नेमबाजीत शिवा नरवालने 590 गुणांचा नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्ण घेतले. महिलांच्या 50 मी. पिस्तुल नेमबाजीत सिमरनप्रीत कौरने पंजाबसाठी सुवर्ण मिळविले.









