वृत्तसंस्था/ जकार्ता
आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या नेमबाजी स्पर्धेत भारताचे नेमबाज अखिल शेरॉन आणि ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर यांनी पुरुषांच्या 50 मी. रायफल थ्री पोजिशन नेमबाजी प्रकारात अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावले.
पुरुषांच्या 50 मी. रायफल थ्री पोजिशन नेमबाजी प्रकारात अंतिम फेरीत एकूण 8 स्पर्धकांचा समोश होता. भारतीय नेमबाज अकिल शेरॉनने 460.2 गुणासह सुवर्णपदक तर एwश्वर्य प्रतापसिंग तोमरने 459.0 गुणासह रौप्यपदक तसेच थायलंडच्या पी. व्हाँगसुकेदीने 448.8 गुणासह कास्यपदक पटकावले. या स्पर्धेमध्ये पुरुषांच्या 50 मी. रायफल थ्री सांघिक प्रकारात भारताच्या शेरॉन आणि तोमर यांनी स्वप्नील कुसाळेसमवेत सुवर्णपदक मिळवले. सांघिक प्रकारात चीनने रौप्य तर द. कोरियाने कास्यपदक घेतले. भारताने 1758 गुण घेत प्रथम स्थान मिळवले असून चीनने 1744 गुणासह रौप्यपदक घेतले. या स्पर्धेमध्ये पदक तक्त्यात शुक्रवार अखेर भारताने 10 सुवर्ण, 8 रौप्य आणि सहा कास्य अशी 24 पदकांची कमाई केली. या स्पर्धेमध्ये शनिवारी रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजीत ऑलिम्पिक कोटा पद्धतीत स्थान मिळवणारे नेमबाज निश्चित होतील.









