वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम
2023 च्या आयबीएसए विश्व क्रीडा स्पर्धेत पाकच्या पुरुष अंध क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात भारताचा दणदणीत पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. पाकने हा सामना 8 गड्यांनी जिंकुन ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय अंध पुरुष क्रिकेट संघाने 20 षटकात 184 धावा जमवत पाकला निर्णायक विजयासाठी 185 धावांचे आव्हान दिले. भारताच्या डावामध्ये डी. आर. टोमपेकीने 57 चेंडूत 76 धावा झळकवल्या. टोमपेकीने व्ही. आर. डुनासमवेत पहिल्या 6 षटकात सलामीच्या गड्यासाठी 50 धावांची भागीदारी केली. डुनाने 18 चेंडूत 20 तर टोमपेकीने 11 चौकारांसह 57 चेंडूत 76 धावा झळकवल्या. एस. रमेशने 29 चेंडूत नाबाद 48 धावा जमवल्याने भारताला 184 धावापर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकच्या डावाला एम. उल्ला आणि एन. अली यांनी दमदार सुरुवात करून दिली. सलामीच्या जोडीने 27 चेंडूत 50 धावांची भागीदारी केली. भारतीय गोलंदाजांना अचूक गोलंदाजी करता आली नाही. तर स्वैर गोलंदाजीमुळे त्यांनी 28 वाईड चेंडु टाकले. पाकच्या डावात 42 धावा अवांतराच्या रुपात मिळाल्या. पाकतर्फे एम. सलमानने 25 चेंडूत नाबाद 48 तर मुनीरने 12 चेंडूत नाबाद 41 धावा झोडपत आपला संघाला सुवर्णपदक मिळवून दिले.
संक्षिप्त धावफलक : भारत 20 षटकात सर्वबाद 184 (टोमपेकी 76, डुना 20, रमेश नाबाद 48), पाक 2 बाद 185 (सलमान नाबाद 48, बी. मुनीर नाबाद 41).









