पॅरालिम्पिकमध्ये चौथ्या दिवशी भारताचा डंका: एका सुवर्णासह दौन रौप्य व कांस्यपदकाची कमाई
वृत्तसंस्था/ पॅरिस
भारताच्या नितेश कुमारने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. नितेशने पुरुष एकेरीच्या बॅडमिंटन एसएल3 स्पर्धेच्या अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा 21-14, 18-21, 23-21 असा पराभव केला. तीन वर्षांपूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या प्रमोद भगतने याच स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. यावेळी नितेशकुमारने हे विजेतेपद पटकावण्याची किमया केली. याशिवाय, थाळीफेकमध्ये योगेश कथुनियाने रौप्य, उंच उडीत निषाद कुमारने रौप्य तर महिलांच्या 200 मी शर्यतीत प्रीती पालने कांस्यपदक जिंकले. या पदकासह भारताच्या पदकांची संख्या 9 झाली आहे. यामध्ये 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे.
सोमवारी पॅराबॅडमिंटनमध्ये एसएल 3 प्रकारात नितेश कुमार व डॅनियल यांच्यात सुवर्णपदकासाठी झालेला सामना चांगलाच चुरशीचा झाला. 80 मिनिटे चाललेल्या या लढतीत उभय खेळाडूंत एकेका गुणासाठी संघर्ष पहायला मिळाला. हरियाणाच्या 29 वर्षीय नितेशने पहिला गेम सहजरित्या जिंकत 1-0 अशी आघाडी घेतली. पण, दुसऱ्या गेममध्ये मात्र त्याला डॅनियलकडून कडवी टक्कर मिळाली. डॅनियलने हा गेम 21-18 असा जिंकला व सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. यानंतर तिसरा व निर्णायक गेमही चांगलाच चुरशीचा झाला. 20-20, 21-21 अशा बरोबरीनंतर नितेशने सलग दोन गुणाची कमाई करत हा गेम 23-21 असा जिंकला व सुवर्णपदक जिंकले. विशेष म्हणजे, पहिलेच पॅरालिम्पिक खेळणाऱ्या नितेशने विजयानंतर जोरदार जल्लोष केला.
विशेष म्हणजे, पॅरालिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो फक्त तिसरा भारतीय खेळाडू आहे. याआधी प्रमोद भगत आणि कृष्णा नागर यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकले होते.
रेल्वे अपघात, आयआयटी पदवीधर अन् सुवर्ण
विशाखपट्टणममध्ये 2009 साली झालेल्या एका रेल्वे अपघातामध्ये नितेशने डावा पाय गमावला होता. या अपघातानंतर तो अनेक महिने अंथरुणाला खिळून होता. नितेशने या अपघातानंतरही जिद्द न गमावता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजीच्या प्रवेश परीक्षेची तयारी केली. ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होत त्याने आयआयटी मंडीमध्ये 2013 साली प्रवेश मिळवला. आयआयटीमध्येच त्याला बॅडमिंटनची गोडी निर्माण झाली. 2016 साली त्याने पॅरालिम्पिक गटातील राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. यानंतर त्याने आशियाई पॅरा गेम्स, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकले आहे. आयआयटी पदवीधर असलेला नितेश हरयाणा सरकारमधील क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयात वरिष्ठ मार्गदर्शक म्हणून काम करत आहे.
थाळीफेकमध्ये योगेश कथुनियाला रौप्य
पॅरा बॅडमिंटनमध्ये नितेश कुमारने सुवर्ण जिंकल्यानंतर पुरुषांच्या थाळीफक एफ56 स्पर्धेत भारताच्या योगेश कथुनियाने रौप्यपदक जिंकले. योगेश कथुनियाचा पहिला थ्रो 42.22 मीटर होता. यानंतर, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा अनुक्रमे 41.50 मीटर, 41.55 मीटर, 40.33 मीटर आणि 40.89 मीटर होता. विशेष म्हणजे, योगेशने भारताकडून दुसऱ्यांदा पॅरालिम्पिक स्पर्धेत भाग घेतला आणि पुन्हा एकदा यशाची पुनरावृत्ती केली. त्याने टोकियो पॅरालिम्पिकमध्येही भारतासाठी रौप्यपदक जिंकले होते. 27 वर्षीय योगेशने पहिल्याच प्रयत्नात 42.22 मीटर थाळी फेकली, जो त्याचा सर्वोत्तम प्रयत्न होता. या स्पर्धेत ब्राझीलच्या बतिस्ता डॉस सँटोस क्लाउडनीने सुवर्णपदक जिंकले. त्याने 46.86 च्या सर्वोत्तम थ्रोसह ही कामगिरी केली. बतिस्ताचा हा थ्रो पॅरालिम्पिक खेळांच्या इतिहासातील या स्पर्धेतील सर्वोत्तम थ्रो ठरला. दुसरीकडे, ग्रीसच्या कॉन्स्टँटिनोसने 41.32 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह कांस्य जिंकले.
बहादुरगडचा रहिवासी असलेल्या योगेशला टोकियो पॅरालिम्पिकमधील कामगिरीबद्दल 2021 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वयाच्या 9 व्या वर्षी गुलेन बैरी सिंड्रोन हा आजार झालेल्या योगेशने हार मानली नाही. अथक प्रयत्नातून त्याने टोकियो पॅरालिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये यश मिळवले आहे. थाळीफेक प्रकारात ब्राझीलचा बतिस्ता त्याचा मुख्य प्रतिस्पर्धी आहे. आगामी काळात बतिस्तापेक्षा शानदार कामगिरी करण्यावर आपला भर असणार असल्याचे योगेशने यावेळी सांगितले.
उंच उडीत निषाद कुमारला सर्वोत्तम कामगिरीसह रौप्य
पुरुषांच्या टी 47 उंच उडी स्पर्धेत भारताच्या निषाद कुमारने रौप्यपदक जिंकण्याची किमया केली. रविवारी रात्री उशिरा झालेल्या अंतिम फेरीत 2.04 मीटर लांब उडी मारुन त्याने दुसरे स्थान पटकावले. याशिवाय भारताचा राम पाल हा अॅथलिट देखील याच स्पर्धेत सहभागी झाला होता, परंतु तो 1.95 मीटर उंच उडी मारण्यात यशस्वी ठरला. अमेरिकेच्या रॉड्रिक रॉबर्ट्सने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. निषाद कुमार पॅरा अॅथलेटिक्समध्ये सलग दोन पदके जिंकणारा सर्वात तरुण भारतीय ठरला. निषादने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतही रौप्य जिंकले होते. त्याने टोकियोमध्ये 2.06 मीटर उडी मारली होती.
निषाद कुमार हा हिमाचल प्रदेशातील उना जिह्यातील रहिवासी आहे. लहानपणी एका अपघातात मनगट गमावल्यानंतरही निषादने हार मानली नाही आणि आता पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकून त्याने इतिहास रचला आहे. निषादचे हे यश त्याच्या संघर्षाची आणि मेहनतीची कहाणी सांगते. 2009 मध्ये अॅथलेटिक्समध्ये पदार्पण करणाऱ्या निषादचा पॅरिसपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. पण, हार न मानणाऱ्या निषादने अशक्य ते शक्य करुन दाखवत सलग दोन पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची किमया केली आहे.
महिलांच्या 200 मी शर्यतीत प्रीत पालला कांस्य
रविवारी रात्री उशिरा झालेल्या महिलांच्या 200 मीटर टी-35 प्रकारात प्रीती पालने कांस्यपदक पटकावले. 30.01 सेंकद या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह तिने तिसरे स्थान पटकावले. चीनच्या जिया झाऊला सुवर्ण तर कियान गुओला रौप्य पदक मिळाले. प्रीतीने 100 मीटर शर्यतीतही कांस्यपदक पटकावले. ट्रॅक इव्हेंटमध्ये भारतासाठी 2 पॅरालिम्पिक पदके जिंकणारी ती पहिली खेळाडू आहे. प्रीतीच्या या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
बॅडमिंटनमध्ये आणखी पदके मिळणार
दरम्यान, पॅरा बॅडमिंटनमध्ये पुरुष गटात सुहास एल वाय तर महिलात मुरुगसेन तुलसीमती हे दोघे सुवर्णपदकासाठी लढणार आहेत. सोमवारी रात्री या दोघांच्या लढती होणार आहेत. याशिवाय, मनिषा रामदास, सुकांत कदम व नित्या सिवान कांस्यपदकासाठी लढणार आहेत. यामुळे बॅडमिंटनमध्ये भारताला आणखी पदके मिळण्याची शक्यता आहे.
पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारे भारतीय
- अवनी लेखरा (नेमबाजी) – सुवर्ण, महिला 10 मीटर एअर रायफल
- मोना अगरवाल (नेमबाजी) -कांस्य, महिला 10 मीटर एअर रायफल
- प्रीती पाल (अॅथलेटिक्स) – कांस्य, महिलांची 100 मीटर शर्यत
- मनीष नरवाल (नेमबाजी) – रौप्य, पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल
- रुबिना फ्रान्सिस (नेमबाजी) – कांस्य, महिला 10 मीटर एअर पिस्तूल
- प्रीती पाल (अॅथलेटिक्स) – कांस्य, महिलांची 200 मीटर शर्यत
- निषाद कुमार (अॅथलेटिक्स) – रौप्य, पुरुष उंच उडी
- योगेश कथुनिया (अॅथलेटिक्स) – रौप्य, पुरुष थाळी फेक
- नितेश कुमार (बॅडमिंटन) – रौप्यपदक