अंतिम फेरीत जपानवर एकतर्फी मात : जेतेपदासह मिळवला पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा
भारताची तेराव्या दिवशी 1 सुवर्णांसह दोन रौप्य व सहा कांस्यपदकाची कमाई
वृत्तसंस्था/ हांगझाऊ
चीनमध्ये सुरु असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने जपानला 5-1 असे एकतर्फी नमवत सुवर्णपदक जिंकले. या विजयासह भारतीय संघ पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी देखील पात्र ठरला आहे. याशिवाय, स्पर्धेच्या तेराव्या दिवशी भारताने एका सुवर्णपदकासह दोन रौप्य व सहा कांस्यपदकाची कमाई केली आहे. पदकतालिकेत भारत आता 22 सुवर्ण, 34 रौप्य व 39 कांस्यपदकासह एकूण 95 पदकाची कमाई करत चौथ्या स्थानावर आहे.

सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या भारतीय संघाने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यानंतर दुस्रया क्वार्टरमध्ये सामन्याच्या 25 व्या मिनिटाला भारताकडून पहिला गोल करण्यात आला. मनदीप सिंगने हा गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. rयानंतर हाफ टाईमपर्यंत भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतली होती. यानंतर तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये हरमनप्रीत सिंगने (32 वे मिनिट) पेनल्टीचा फायदा घेतला आणि 10 ते 15 मीटर लांबूनन शानदार शॉट मारून गोल केला. यामुळे भारताची आघाडी 2-0 अशी झाली. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारताने पेनल्टीवर आणखी एक गोल करून 3-0 अशी मजबूत आघाडी केली. यावेळी अमित रोहिदासने (36 वे मिनिट) मैदानी गोल करत जपानच्या गोलपोस्ट मध्ये हल्ला चढवला. चौथ्या क्वॉर्टरमध्ये अभिषेकने (48 वे मिनिट) आणखी एक गोल करून सुवर्णपदक निश्चित केले. त्यानंतर जपानने (51 वे मिनिट) मॅचमधील त्यांचा पहिला गोल करून आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. लढत संपण्याच्या 2 मिनिटे आधी भारताने पाचवा गोल केला आणि आघाडी 5-1 अशी केली. यानंतर ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत भारताने हा सामना जिंकला व तब्बल नऊ वर्षानंतर सुवर्णपदकाला गवसणी घातली.
तब्बल नऊ वर्षानंतर सुवर्ण
भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी महिला हॉकी संघ स्टेडियममध्ये उपस्थित होता. संपूर्ण आशियाई स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने शानदार कामगिरी केली आणि अंतिम फेरीत जपानविरुद्ध देखील भारताने पुन्हा एकदा धमाकेदार खेळ करून दाखवला. भारतीय संघाने या स्पर्धेत एकही लढत गमावली नाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हॉकीमधील हे चौथे सुवर्णपदक आहे. यापूर्वी 1966, 1998 आणि 2014 साली आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. यानंतर तब्बल नऊ वर्षानंतर पुरुष संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. तसेच भारतीय संघाचे आशियाई स्पर्धेतील 16 वे पदक आहे. याआधी 1958, 1962, 1970, 1974, 1978, 1982, 1990, 1994 आणि 2002 साली रौप्यपदक जिंकले होते. त्याचबरोबर 1986, 2010 आणि 2018मध्ये कांस्यपदक जिंकले आहे.
तिरंदाजीत पुरुष रिकर्व्ह संघाला रौप्य तर कोरियाला गोल्ड
दरम्यान, तिरंदाजी क्रीडा प्रकारात शुक्रवारी पुरुष रिकर्व्ह संघाला सुवर्णपदकाच्या लढतीत दक्षिण कोरियाकडून 5-1 असा पराभव स्वीकारावा लागला. कोरियाने एकतर्फी विजय मिळवत सुवर्णपदक जिंकले तर भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रौप्यविजेत्या भारतीय संघात अतानू दास, प्रभाकर शेळके व धीरज यांचा समावेश होता. दरम्यान, उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशचा धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली होती. पण, बलाढ्या कोरियन संघापुढे भारतीय तिरंदाजी रिकर्व्ह संघाला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.
तिरंदाजीत महिला रिकर्व्ह संघाला कांस्य
शुक्रवारी भारतीय महिला तिरंदाजांनी रिकर्व्ह कॅटेगरीत कांस्यपदकाला गवसणी घातली आहे. गेल्या 13 वर्षात आशियाई क्रीडा स्पर्धेतील रिकर्व्ह कॅटेगरीतील हे भारतासाठी पहिलंच पदक ठरले आहे. भारतीय महिला संघात अंकिता भकत, भजन कौर आणि सिमरनजित कौरने यांचा समावेश होता. कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने व्हिएतनामवर 6-2 फरकाने विजय मिळवला आहे.
ब्रिजमध्ये पुरुष संघाला रौप्य
2018 आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या भारतीय संघाकडून यंदाच्या आशियाई स्पर्धेतही जेतेपदाच्या अपेक्षा होत्या. पण, शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय पुरुष ब्रिज संघाला हाँगकाँगकडून 238.1-152 असा पराभव स्वीकारावा लागला. या व्र्रीडाप्रकारात हाँगकाँगने सुवर्ण तर भारताने रौप्यपदक पटकावले. भारतीय संघात संदीप ठकराल, जग्गी शिवदासनी, राजू तोलानी व अजय प्रभाकर यांचा समावेश होता.
41 वर्षानंतर बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक
भारताने तब्बल 41 वर्षांनी एशियन गेम्समध्ये बॅडमिंटन पुरुष एकेरीत भारताला पदकप्राप्ती झाली आहे. भारताच्या एचएस प्रणॉयचा चीनच्या ली शिफयांगविरूद्धच्या उपांत्य सामन्यात 21-16, 21-9 गेम्सनी पराभव झाला. मात्र पाठदुखीने त्रस्त असलेल्या प्रणॉयने झुंजार वृत्ती दाखवत अखेर कांस्यपदक जिंकले. भारताला एशियन गेम्समध्ये बॅडमिंटन पुरुष एकेरीमध्ये 1982 मध्ये पदक मिळाले होते. यानंतर तब्बल 41 वर्षानंतर प्रणॉयने कांस्यपदक पटकावले आहे. दरम्यान, पदक जिंकल्यानंतर प्रणॉयने टी शर्ट काढत प्रशिक्षक गोपीचंद यांना मिठी मारत आनंद साजरा केला.
सेपाकटकरॉमध्ये महिला संघाला ब्राँझ
शुक्रवारी स्पर्धेच्या तेराव्या दिवशी सेपाकटकरॉ क्रीडा प्रकारात भारतीय महिला संघाने थायलंडला 21-10, 21-13 असे पराभूत केले. या उपांत्य सामन्यात महिला संघाने शानदार कामगिरी करताना प्रथमच आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. भारतीय संघात अयेकपम देवी, ओइनम देवी, खुशबू, एलांगबम प्रिया देवी, एलांगबम लोरे देवी यांचा समावेश होता.
कुस्तीमध्ये तीन कांस्य, बजरंग पुनियाची सपशेल निराशा
यंदाच्या आशियाई स्पर्धेत कुस्ती क्रीडा प्रकारात भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा होती. पण, दिग्गज कुस्तीपटूंनी निराशा केल्यामुळे एकही सुवर्णपदक मिळू शकले नाही. दरम्यान, शुक्रवारी पुरुषांच्या 57 किलो गटात अमनने चीनच्या मिंगू लियूला पराभूत करत कांस्यपदक जिंकले. याशिवाय, महिलांच्या 76 किलो गटात किरणनने मंगोलियाच्या अरियुजरंगाला नमवत कांस्यपदक पटकावले तर महिलांच्या 62 किलो गटात सोनमने चीनच्या जिया लाँगला नमवत कांस्यपदकाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, भारताचा दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनियाला 65 किलो गटात कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत जपानच्या कायकी यामागुचीकडून 10-0 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला.
भारताची 100 पदके निश्चित
चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत 100 पदकांचा टप्पा गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. शुक्रवारी 9 पदके जिंकल्यानंतर भारताच्या पदकांची संख्या 95 झाली आहे. यासह आज भारताने 4 खेळांमध्ये आपली 7 पदके निश्च्ति केली आहेत. यानुसार भारत 100 पदके जिंकण्याच्या जवळ आहे. दरम्यान, तिरंदाजी, क्रिकेट, कुस्ती, कब•ाrचे सामने बाकी आहेत. या प्रकारात भारताची पदके निश्चित असल्यामुळे यामुळे यंदाच्या स्पर्धेत भारत शंभरचा आकडा पार करेल, यात शंकाच नाही.









