सुवर्णविजेता जपानचा पुरुष जिम्नॅस्टिक्स संघ
वृत्तसंस्था/पॅरिस
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पुरूषांच्या सांघिक जिम्नॅस्टिक्स प्रकारात जपानने चीनला मागे टाकत सुवर्णपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात अमेरिकेने कास्य पदक मिळवून आपला पदकांचा दुष्काळ संपुष्टात आणला.
पुरूषांच्या सांघिक जिम्नॅस्टिक प्रकारात 12 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक मिळविण्यासाठी चीन सज्ज झाला होता. पण जपानच्या पुरुष जिमनॅस्टिक संघाने अंमित रोटेशनमध्ये चीनला मागे टाकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. चीनचा जिमनॅस्ट सु वेदी याला हॉरिझोंटल बारवरुन आपली कसरत करताना दोनवेळा अपयशी ठरला. जपानने चीनचा 0.532 गुण फरकाने पराभव करत सुवर्णपदक घेतले. 2008 नंतर अमेरिकेने जिमनॅस्टिक प्रकारात आपले पहिले कास्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात पात्र फेरीमध्ये चीनने जपानला मागे टाकले होते. जपान या क्रीडा प्रकारातील विद्यमान विश्वविजेता आहे. जपानचे या क्रीडा प्रकारातील सांघिक प्रकारात हे आठवे तर 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेनंतरचे पहिले पदक आहे. अमेरिकेला या क्रीडा प्रकारात गेली 16 वर्षे पदक मिळविता आले नव्हते. कास्यपदकासाठीच्या लढतीत अमेरिकेने 257.793 गुण नोंदवित ब्रिटनला मागे टाकत कास्यपदक मिळविले. टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रशियाने या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळविले होते. पण युक्रेन बरोबर सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे रशियाचे पथक या स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाही.









