वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सोन्याच्या दराने इतिहासात प्रथमच 1 लाखाची मर्यादा ओलांडली आहे. मंगळवारी एका दिवसात सोन्याच्या दराने 2 हजारांहून अधिक वाढ नोंदविली आहे. त्यामुळे दिल्ली आणि मुंबई इत्यादी महानगरांमध्ये सोने प्रति दहा ग्रॅम 1 लाख 200 रुपयांपर्यंत पोहचले आहे. सोन्याच्या वायदे बाजारातही ही किंमत 1 लाखाच्या पार पोहचली आहे. अमेरिकेतील घडामोडींमुळे सोन्याला जगभरात मोठी मागणी येत असून त्यामुळे ही किंमतवाढ होत असल्याचे तज्ञांचे मत आहे.
मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार सोन्याच्या वायद्याचे दर ऑगस्टच्या डिलिव्हरीसाठी 1 लाख 200 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या फेडरल बँकेची पुनर्रचना करण्याची घोषणा केली असून या घोषणेचे परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवरही होणार आहेत. ही पुनर्रचना कशाप्रकारे होणार आहे, हे अद्याप स्पष्ट नसले तरी केवळ या वृत्तामुळे वित्त आणि सोने बाजारात बरीच खळबळ उडाली आहे.
दर उतरले काही प्रमाणात
सोमवारी संध्याकाळच्या आसपास सकाळच्या तुलनेत सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट झालेली पहावयास मिळाली आहे. भारताच्या बाजारपेठांमध्ये सोनेदर दिवसअखेर 99 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर स्थिरावला होता. त्यामुळे सोने व्यापारी आणि ग्राहक यांचे लक्ष बुधवारच्या स्थितीवर लागून राहिले आहे. सध्याची जागतिक आर्थिक परिस्थिती, अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारसंघर्ष तसेच यामुळे निर्माण झालेली अस्थिरता यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे. सोन्यातील गुंतवणूक स्थिरवाढीसाठी महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे अस्थिर आर्थिक परिस्थितीच्या काळात सोने आधार मानले जाते. आगामी काही दिवसांमध्ये सोने बाजार कोणती वळणे घेतो याकडे आता साऱ्यांची दृष्टी लागून राहिली असून चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.
आठवडाभर सतत वाढ
गेला एक आठवडाभर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. प्रतिदिन जवळपास 500 रुपये ते 1,000 रुपये प्रति दहा ग्रॅम असा वाढीचा दर आहे. मंगळवारी तो याहीपेक्षा अधिक वाढल्याने मोठी हालचाल पहावयास मिळाली. सोनेदरवाढीला गेल्या दोन महिन्यांच्या घडामोडींची पार्श्वभूमी आहे.









