वृत्तसंस्था /बाकू (अझरबैजान)
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफच्या विश्व्व नेमबाजी स्पर्धेत बुधवारी भारतीय नेमबाजांनी एक सुवर्ण आणि एक कास्य अशी एकूण दोन पदके मिळविली. पुरूषांच्या 25 मि. स्टँडर्ड पिस्तूल नेमबाजीत अमनप्रितसिंगने सुवर्णपदक पटकाविले. तर महिलांच्या स्टँडर्ड पिस्तूल सांघिक नेमबाजीत भारताने कास्य पदक पटकाविले. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत भारतीय नेमबाजांनी 5 सुवर्ण आणि 4 कास्य अशी एकूण 9 पदकांची कमाई करत पदकतक्त्यात दुसरे स्थान मिळविले आहे. चीनने 13 सुवर्णासह एकूण 24 पदके पटकावित अग्रस्थान पटकाविले आहे. बुधवारी झालेल्या पुरूषांच्या 25 मि. स्टँडर्ड पिस्तूल नेमबाजीत अमनप्रितसिंगने 577 गुणांसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. कोरियाच्या ली गुनहेयॉकने 574 गुणांसह रौप्यपदक तर फ्रान्सच्या केव्हीन चेपॉनने कास्यपदक पटकाविले. पुरूषांच्या विभागात भारताच्या हर्ष गुप्ता, अक्षय जैन आणि अमनप्रित यांचे सांघिक प्रकारातील पदक थोडक्यात हुकले. चीनने 1695 गुणांसह पहिले स्थान, जर्मनीने दुसरे तर कोरियाने तिसरे स्थान पटकाविले. भारतीय नेमबाजांना या सांघिक प्रकारात चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. महिलांच्या 25 मि. स्टँडर्ड पिस्तूल सांघिक गटात या महिला नेमबाजांनी 1601 गुण नोंदवित कास्यपदक मिळविले. या क्रीडाप्रकारात चीनने सुवर्ण तर यजमान अझरबैजानने रौप्यपदक पटकाविले. पुरूषांच्या ट्रॅफ नेमबाजीत भारताच्या टी. पृथ्वीराज आणि ऑलिंपियन नेमबाज किनॉन यांनी समान 72 गुण मिळविले. भारताच्या झोरावरसिंग संधूने 68 गुण नोंदविले.









