वृत्तसंस्था /कोलकाता, गुवाहटी
132 व्या ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धेत कोलकाता येथे झालेल्या सामन्यात गोकुळाम केरळ संघाने भारतीय हवाई दल संघाचा तर गुवाहटीमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नियन एफसी संघाने हेदराबाद एफसी संघाचा पराभव केला. गुरुवारी कोलकातामधील केबीके मैदानावर झालेल्या सामन्यात माजी विजेत्या गोकुळाम केरळ एफसीने भारतीय हवाई दल संघाचा 2-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. या सामन्यात गोकुळाम केरळ संघातील सौरभ आणि श्रीकुटीन यांनी प्रत्येकी एक गोल केला. क गटातील या सामन्यात भारतीय हवाई दल संघाला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. 20 व्या मिनिटाला गोकुळाम केरळ संघाने खाते उघडण्याची संधी गमवली. त्यांच्या पेरडोमोचा फटका गोलपोस्टच्या वरून गेल्याने केरळ संघाला हा गोल नोंदवता आला नाही. 30 व्या मिनिटाला सौरभने चेंडूवर ताबा ठेवत गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली आणि त्याने भारतीय हवाई दलाच्या गोलरक्षकाला हुलकावणी देत गोकुळाम केरळचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत गोकुळाम केरळने 1-0 अशी आघाडी घेतली होती. 60 व्या मिनिटाला श्रीकुटीनने गोकुळाम केरळचा दुसरा गोल केला. शेवटच्या 10 मिनिटांच्या कालावधीत भारतीय हवाई दल संघाने पाठोपाठ हल्ले केले पण त्यांना केरळ संघाच्या भक्कम बचावफळीमुळे आपले खाते उघडता आले नाही.
गुवाहटीमध्ये गुरुवारी झालेल्या ई गटातील सामन्यात चेन्नियन एफसी संघाने हैदराबाद एफसी संघाचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या विजयामुळे चेन्नियन एफसी ई गटात आघाडीवर आहे. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला एफसी हैदराबादचे खाते चिंगलेसेना सिंगने पेनल्टीवर उघडले. सहाव्या मिनिटाला अॅलेक्स साजीने चेन्नियन एफसीला बरोबरी साधून दिली. 15 व्या मिनिटाला चेन्नियन एफसीचा दुसरा गोल कॉनर शिल्डसने केला. मध्यंतरापर्यंत चेन्नियन संघाने हैदराबादवर 2-1 अशी आघाडी घेतली होती. 46 व्या मिनिटाला जॉर्डन मरेने चेन्नियन एफसीचा तिसरा गोल नोंदवून हैदराबाद एफसीचे आव्हान संपुष्टात आणले.









