गेल्या 15 दिवसांपासून गायीचे दूध खरेदी दर कपात करू नका म्हणून शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यामुळे गाय दूध खरेदी दर पूर्ववत करण्याची विनंती केल्यावरही गोकुळच्या सत्ताधाऱ्यांनी याला नकार दिला असल्याचा खुलासा गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी आज केला आहे.
हेही वाचा >>> गोकुळचा गाय दूध खरेदी दर सर्वाधिक; गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा दावा
आज शौमिका महाडिक य़ांनी पत्रकार परिषद घेऊन गोकुळच्या संचालक मंडळामध्ये मांडलेल्या प्रश्नावर माहीती दिली आहे. त्या म्हणाल्या, “आज गोकुळच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. गेल्या 15 दिवसांपासून गायीचे दूध खरेदी दर कपात करू नका यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. दर पूर्ववत करण्याबाबत मी विनंती केली पण सत्ताधाऱ्यांनी याला स्पष्ट नकार देऊन मिटिंगमध्ये दर पूर्ववत करता येणार नाही असे सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट सांगितले.” असे त्यांनी कथन केले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “जिल्हा बाहेरील दूध कमी करण्यासही मी सांगितले पण त्यांनी मान्य केलं नाही. कोल्हापूर उत्तरच्या पोट निवडणुकीवेळी शहरातील विक्री दर स्थिर ठेवले होते. तीच पॉलिसी आजदेखील राबवणं गरजेचं आहे. दूध खरेदी दरात कपात करण्याची गोकुळला अजिबात गरज नाही. खरेदी दरात कपात केली पण विक्री दरात काहीही कपात केली नाही.” असेही त्या म्हणाल्या.
सत्ताधाऱ्यांवर आरोप करताना त्या म्हणाल्या, “मी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने उभी आहे. कर्ज काढून शेतकऱ्यांनी गायी घेतल्या आणि तुम्ही आता दर कमी केला. गोकुळ दुध संघातला अनावश्यक खर्च कमी केला गेला नाही. हॉटेलिंग, मोबाईल, गाडी घेणं हे सत्ताधाऱ्यांनी कमी केलं नाही. बोलून मार्ग काढणं गरजेचं असताना दुध उत्पादक शेतकरी गोकुळ सोडून कुठं जातात हा सत्ताधाऱ्यांचा विचार चुकीचा आहे. ” असेही त्या म्हणाल्या.