गोकुळच्या सभेसाठी सभागृहात हजर असलेले निम्म्याहून अधिक सभासद आणि ठरावधारक हे बोगस असल्याचा दावा शौमिका महाडिक यांनी केला आहे. तसेच खऱ्या सभासदांना सभागृहाबाहेर ताटकळत ठेवल्याचा आरोपही त्यांनी सतेज पाटील यांच्यावर केला. तसेच मला व्यासपीठावर सतेज पाटील यांनी बोलवावं आणि मी जे प्रश्न विचारते त्यांची उत्तरे सत्ताधाऱ्यांनी द्यावित असे आव्हानही त्यांनी सतेज पाटलांना दिले आहे.

संपुर्ण राज्याचे लक्ष लागून राहीलेल्या गोकुळची सर्वसाधारण सभा आज चालु असून या सभेमध्ये सत्ताधारी सतेज पाटील आणि महाडिक गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. कडक बंदोबस्तात चालु असलेल्या या सभेमध्ये महाडिक गटाचे समर्थक घुसल्याने एकच गोंधळ झाला. आपल्या समर्थकांसह सभागृहाच्या बाहेर थांबलेल्या शौमिका महाडिक माध्यमांशी संवाद साधताना आमदार सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यावर गंभिर आरोप केला. त्या म्हणाल्या, “या सभेसाठी आलेले पण सभागृहात असलेले निम्म्याहून अधिक सभासद बोगस आहेत. या सभासदांना ठरावाची झेरॉक्स वाटण्यात आली असून त्यांना सत्ताधाऱ्यांनी प्रवेश दिला आहे. खरे सभासद हे बाहेर थांबलेले असून अजूनही त्यांना प्रवेश दिला गेला नाही. हे ठरावधारक आणि सभासद कोल्हापूरातून शाहूवाडी सारख्या दुर्गम भागातून आले आहेत. त्यांची दोन किलोमीटरपर्यंत रांग सभागृहाबाहेर लागलेली आहे. त्यांना सत्ताधाऱ्यांनी ताटकळत ठेवले आहे.” असा आरोप शौंमिका महाडिक यांनी सत्ताधाऱ्यावर केला.









