कोल्हापूर / धीरज बरगे :
जिल्हा दूध संघ अर्थात ‘गोकुळ’ने करमाळा येथील सौरऊर्जा प्रकल्पापाठोपाठ आता स्वमालकीचा पेट्रोल पंप उभारला आहे. त्यामुळे वीज बिलापाठोपाठ आता गोकुळच्या पेट्रोल–डिझेल खर्चामध्ये वर्षाकाठी सुमारे 1 कोटी रुपयांहून अधिकची बचत होणार आहे. गोकुळच्या गोकुळ शिरगांव (ता.करवीर) येथील मुख्य प्रकल्पालगत पुणे–बंगळूर महामार्गालगत 25 गुंठे जागेत उभारलेल्या पेट्रोल पंपाचे रविवारी, 30 रोजी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाने सुरुवातीपासूनच बचतीचे धोरण अवलंबले आहे. करमाळा सोलापूर येथे नुकताच 18 एकर जागेवर गोकुळने 33.33 कोटी रुपये खर्च करुन 6.5 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प सुरु केला आहे. यामधून वर्षाला 1 कोटी युनिट वीजनिर्मिती होणार आहे. वीज बिलावरील खर्चात 6 कोटी रुपयांची बचत होणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्पापाठोपाठ आता गोकुळचा स्वमालकीचा पेट्रोल पंपही पूर्णत्वास आला आहे. पेट्रोल पंपातून मिळणाऱ्या उत्पन्नामधून एकप्रकारे गोकुळच्या पेट्रोल–डिझेल खर्चामध्ये बचतच होणार आहे.
- दिवसाला 7 ते 9 हजार लिटर डिझेलचा वापर
गोकुळ दूध संघाकडून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वितरणासाठी मोठ्या प्रमाणात वाहनांचा वापर होतो. दूध, दुग्धजन्य पदार्थ घेऊन सुमारे 350 अधिक टँकर, टेम्पो व अन्य छोटी–मोठी वाहने धावत असतात. या सर्व वाहनांसाठी दिवसाकाठी सुमारे 7 ते 9 हजार लिटर इतके डिझेल लागते. आतापर्यत बाहेरील पेट्रोल पंपावर या वाहनांमध्ये डिझेल भरले जायचे. आता गोकुळने स्वमालकीचा पेट्रोलपंप उभारल्याने गोकुळच्या वाहतूक ठेकेदारांना हक्काचा पेट्रोलपंप उपलब्ध झाला आहे.
- 350 वाहने 1 हजार कर्मचारी
गोकुळच्या गोकुळ शिरगांव येथील मुख्य प्रकल्प आणि कागल पंचतारांकीत वसाहत येथील पशुखाद्य कारखाना मिळून सुमारे 350 हून अधिक वाहनांचा वापर होतो. मुख्य प्रकल्पस्थळी सुमारे कायमस्वरुपी व कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या 1 हजारांहून अधिक आहे. पशुखाद्य कारखाना येथे सुमारे 150 कर्मचारी संख्या आहे. त्यामुळे 350 वाहने, 1 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी गोकुळचा पेट्रोलपंप फायदेशीर ठरणार आहे.
- वर्षाकाठी 1 कोटी रुपयांची बचत
गोकुळला दिवसाला 7 ते 9 हजार लिटर डिझेल लागते. त्यानुसार वर्षाला केवळ गोकुळ दूध व दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी 30 लाख लिटर इतके डिझेल लागणार आहे. तसेच पेट्रोल विक्री होईल ती वेगळीच. एकूण केवळ गोकुळकडील वाहने आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून होणाऱ्या पेट्रोल, डिझेल विक्रीतून गोकुळला वर्षाकाठी सुमारे 1 कोटी रुपयांहून अधिकचे उत्पन्न मिळणार आहे. हे उत्पन्न म्हणजेच गोकुळसाठी दैनंदिन खर्चातील बचतच आहे.
- आता आईस्क्रीम उत्पादनाची प्रतिक्षा
गोकुळने दूध विक्रीनंतर दुग्धजन्य पदार्थ निर्मितीवरही भर दिला आहे. दही, ताक, श्रीखंड, आम्रखंड, फ्लेवर मिल्क, बासुंदी, पनीर, बटर असे विविध दुग्धजन्य पदार्थ गोकुळकडून तयार केले जातात. गोकुळचे नेते, संचालक मंडळाने ठरवल्याप्रमाणे सौरऊर्जा प्रकल्प आणि पेट्रोल पंप असे दोन प्रकल्प पूर्ण झाले आहेत. अमूलला टक्कर देण्यासाठी आईस्क्रीम क्षेत्रातही पाऊल टाकण्याचा मानस गोकुळचा आहे. त्यामुळे आता आईस्क्रीम उत्पादनाचा प्रकल्प केंव्हा मार्गी लागणार, याची प्रतिक्षा असणार आहे.
- पेट्रोल पंप फायदेशीर ठरेल
यापुर्वी गोकुळ दुध, दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक करणारे ठेकेदार बाहेरील पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरत होते. त्यामुळे ठेकेदार, कर्मचाऱ्यांमधून अनेक वर्ष गोकुळने स्वमालकीचा पेट्रोल पंप उभारावा, अशी मागणी होत होती. त्यानुसार गोकुळने पेट्रोल पंप सुरु केला आहे. हा पेट्रोल पंप गोकुळशी संबंधित सर्वांसाठीच फायदेशीर ठरणार आहे.
– अरुण डोंगळे, चेअरमन गोकुळ दूध संघ
- पेट्रोल पंपचा थोडक्यात आढावा
पेट्रोल पंपाची जागा : 25 गुंठे
गोकुळकडील वाहनांची संख्या : 350
मुख्य प्रकल्प येथील कर्मचारी संख्या : 1000
पशुखाद्य कारखाना येथील कर्मचारी संख्या : 150
वाहतुकीसाठी दिवसाकाठी लागणारे डिझेल : 7 ते 9 हजार लिटर
वर्षाकाठी पेट्रोल–डिझेल खर्चात होणारी बचत : सुमारे 1 कोटीहून अधिक








