Shoumika Mahadik News : गोकुळमधील अनागोंदी कारभारापासून गोकुळ वाचवण्यासाठीचा माझा लढा सुरूच राहील असे मत गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडले. गोकुळच्या दूध संकलनात घट झाल्याचे गोकुळमधील सत्ताधाऱ्यांनी मान्य केल्यानंतर पत्रकार परिषद घेत शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या कारभाराविषयी प्रश्न उपस्थित केले.राज्यातील राजकारणाचा परिणाम गोकुळच्या चौकशीवर होणार नसून ,गोकुळसाठीचा माझा लढा सुरूच राहील असेही त्या म्हणाल्या.
गोकुळच्या दूध संकलनात घट झाली आहे, मुंबईमध्ये दूध विक्रीमध्ये घट झाली आहे, पशुखाद्य मागणीमध्ये घट झाली आहे. म्हणजेच सत्ताधाऱ्यांचे धोरणात्मक निर्णय चुकलेले आहेत. अशी टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. गोकुळला याबाबत काहीतरी निर्णय घ्यावे लागतील नाहीतर याचे दूरगामी परिणाम चांगले होणार नाहीत, असा सूचक इशारा त्यांनी दिला.
मुंबईतील यंत्रणेची संपूर्ण घडी विस्कटलेली आहे. तसाच प्रकार पुण्याच्या बाबतीत घडवण्याचा घाट घातला जात आहे. पुण्यातीलही यंत्रणा विस्कळीत झाली तर गोकुळच्या दोन्ही मोठ्या बाजारपेठा संपून जातील. त्यामुळे केवळ राजकीय ईर्षेपोटी संपूर्ण यंत्रणा आणि संघास वेठीस धरणाऱ्यानी याचा विचार करावा. तरीही ईर्षाच करायची असेल तर संघाचे पैसे कोर्ट कचेरीत वाया घालवू नयेत. स्वखर्चाने लढा द्यावा असा टोलाही त्यानी लगावला.
सत्ताधाऱ्यांनी आठशे नवीन दूध संस्था रजिस्टर केल्या आहेत. मग दूध संकलन वाढण्याऐवजी घटले कसं, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. म्हणजे याचा अर्थ फक्त मतांसाठी संस्थांची संख्या वाढवली आहे का, असेही त्या म्हणाल्या.
राज्यात चाललेले राजकारण एका बाजूला आणि सहकारी संस्था व त्याचं कामकाज दुसऱ्या बाजूला, त्यामुळे राजकारणाचा कोणताही परिणाम गोकुळच्या लढ्यावर होऊ देणार नाही. गोकुळ वाचवण्यासाठीचा माझा कोर्टातला लढा सुरूच राहील. आणि दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.