‘गोकुळ’ने नेहमी दूध उत्पाकांचे हित जोपासले
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चा गाय दूध खरेदी दर आज ही सर्वाधिक आहे. तसेच गोकुळमार्फत सेवा सुविधा इतरापेक्षा जास्त दिल्या जातात. गेल्या काही महिन्यापासून गाईच्या दूध उत्पादनात वाढ होत आहे. कोरोनानंतर गाय, म्हैस दुधाला चांगली मागणी होती. त्यामुळे मागणी जास्त व पुरवठा कमी अशी परिस्थिती होते. त्यामुळे उत्पादकांना दुधाला चांगला खरेदी दर देता आला. त्याबरोबरच बटर व दूध पावडरीचे दरही वाढत राहिले होते. परिणामी गेल्या दोन वर्षात प्रतिलिटर 10 ते 11 रुपयांची दूध दरवाढ करण्यात आली. या परिस्थितीमुळे गाय खरेदी करण्यावर दूध उत्पादकांनी भर दिला. यातून गाय दुधाचे उत्पन्न वाढले आहे. यापूर्वी गाय दुधास 35 रुपये प्रति लिटर्स दर दिला जात होता अशी माहिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी पत्रकाद्वारे दिली.
हेही वाचा >>> दूध खरेदी दर कपात मागे घेण्यास सत्ताधाऱ्यांचा स्पष्ट नकार- शौमिका महाडिक
पत्रकात म्हटले आहे, गेल्या दोन महिन्यांत बाजारपेठेतील गाय दूध पावडर, लोणी यांचे दर खूपच कमी झाले आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये गाय लोणी दर प्रति किलो 450 रुपये होता तो आज ऑक्टोबर 2023 मध्ये 350 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. तसेच फेब्रुवारी 2023 मध्ये गाय दूध भुकटीचा दर 280 रुपये प्रति किलो असा होता तो ऑक्टोबर 2023 मध्ये 240 रुपये प्रतिकिलो असा आहे. सरासरी पाहता गाय लोणी व गाय दूध भुकटीचे दर प्रतिकिलो 50 ते 100 रुपयांनी कमी झाले आहेत. त्या अनुषंगाने गोकुळसह सर्वच दूध संघांनी (अमूलसह) ऑक्टोबर 2023 मध्ये गाय दूध खरेदी दरात कपात केली असून सध्या प्रतिलिटर 31 ते 33 रुपये इतका दर दिला जात आहे. त्या अनुषंगाने काही ठिकाणी आंदोलने झाली. या पार्श्वभूमीवरती गाय दूध खरेदी दर कपातीबाबतची खरी परिस्थिती आंदोलनकर्त्यां दूध उत्पादकांनी जाणून घेणे फार महत्वाचे आहे. गोकुळने नेहमीच दूध उत्पाकांचा विचार केला आहे. दूध उत्पादक हेच संघाचे मालक आहेत गाय दूध दर कमी करण्याचा निर्णय हा नाईलास्तव घेण्यात आला आहे. कारण कोणतीही संस्था ही ताळेबंदावरती अवलंबून असते त्यामुळे भावनिक होऊन कोणतेही निर्णय घेऊन चालत नाही. दुग्धव्यवसायाच्या बाजारपेठचा अभ्यास करून त्याची चर्चा व विचार करून दराबाबतचे किंवा इतर धोरणात्मक निर्णय घ्यावे लागणार आहेत. ग्राहकांकडून गोकुळच्या म्हैस दूधालाच जास्त मागणी असून त्या तुलनेत गाय दुधाला मागणी कमी आहे. म्हणूनच म्हैस दूधाचा मागणीच्या तुलनेत पुरवठा व्हावा या हेतूने म्हैस दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हैस दूध खरेदी दरात वाढ केली असल्याचे डोंगळे यांनी पत्रकातून नमूद केले आहे.
गोकुळ दूध संघ नेहमीच दुग्ध व्यवसाय अधिक किफायतशीर व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. कोल्हापूर जिह्यातील सहकाराचा मानबिंदू असण्याऱ्या गोकुळ दूध संघाने नेहमीच दूध उत्पादकांचे हित जोपासले आहे. म्हणून गोकुळ दुध संघ महाराष्ट्रातील सहकारी संस्थाचा मानदंड बनला आहे. ‘गोकुळ‘ने सर्वसामान्य दूध उत्पादक केंद्रस्थानी ठेवून वाटचाल सुरु ठेवली आहे. शेतकऱ्यांच्या हातामध्ये जादा मोबदला मिळावा हीच आमची भूमिका राहिली आहे. गोकुळच्या संचालिका सौ. शौमिका महाडिक यांनी पत्रकार परिषद घेऊन गाय दूध खरेदी दर कपाती बाबत दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये. सर्वांचाच आधारवड असलेला हा गोकुळ दूध संघ वाढला पाहिजे यासाठी वस्तुस्थिती समजावून घ्यावी, असे आवाहन चेअरमन डोंगळे यांनी केले…….









