कोल्हापूर / धीरज बरगे :
गोकुळ दूध संघाने वीज निर्मितीत आत्मनिर्भरतेचे पाऊल टाकले आहे. करमाळा (जि.सोलापूर) येथील गोकुळचा सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वीत झाला आहे. या प्रकल्पातून वर्षाला 1 कोटी दोन लाख युनिट वीज निर्मिती होणार असून यामधून गोकुळच्या गोकुळ शिरगांव (ता.करवीर) येथील मुख्य प्रकल्पाच्या वीज बिलावर होणाऱ्या खर्चामध्ये वर्षाकाठी 6 कोटी रुपयांची बचत होणार आहे. 18 एकर जागेत पसरलेल्या या प्रकल्पावर गोकुळने 33.33 कोटी रुपये खर्च केले आहेत.
गोकुळच्या संचालक मंडळाने काटकसरीचे धोरण राबवत संघाच्या खर्चामध्ये बचत करण्याचे धोरण अवलंबले आहे. या बचतीमागे शेतकऱ्यांकडून संकलित होणाऱ्या म्हैस, गाय दूधास ज्यादा दर यासह अन्य विविध सुविधा पुरविण्या उद्देश गोकुळचा आहे. सौर उर्जा प्रकल्पामधून गोकुळच्या वीज बील खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे.
- 18 एकर जागेत सौर उर्जा प्रकल्प
पुण्यातील एका खासगी कंपनीने लिंबेवाडी (ता.करमाळा, जि. सोलापूर) येथे 200 एकर जागेत हा सौर उर्जा प्रकल्प राबवला आहे. यापैकी 18 एकर जागा गोकुळने खरेदी केली आहे. 6.5 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प असून प्रकल्पासाठी सुमारे 33.33 कोटी रुपये खर्च आला आहे.
- वर्षाला 1.02 कोटी युनीट विज निर्मिती
गोकुळच्या गोकुळ शिरगांव येथील मुख्य प्रकल्पासाठी वर्षाला 1 कोटी 58 लाख युनिट इतक्या विजेचा वापर होतो. या वीज वापरासाठी वर्षाला गोकुळचे 16 कोटी रुपये खर्च होतात. या वीज खर्चामध्ये बचत करण्यासाठी गोकुळने सौर उर्जा प्रकल्पामध्ये पाऊल टाकले. करमाळा येथील सौर उर्जा प्रकल्पातंर्गत 18 एकर जागा खरेदी करत सौर उर्जा प्रकल्प उभारला. यामधून वर्षाला 1 कोटी 02 लाख युनिट वीज निर्मिती होणार आहे. यामधून वीज बिलासाठी होणाऱ्या खर्चामध्ये 6 कोटी रुपयांहुन अधिकची बचत होणार आहे.
- पर्यावरण संरक्षणाचा संदेश
गोकुळने केवळ सौर उर्जा प्रकल्प सुरु केला नसून यामधून पर्यावरण संरक्षणाचा देखिल संदेश दिला आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दरवर्षी सुमारे 8,000 मेट्रीक टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन टाळले जाईल. प्रकल्पाच्या 25 वर्षाच्या कालावधीत एकूण 2 लाख मेट्रीक टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन वाचवता येईल. जे अंदाजे 10 लाख झाडे लावण्याइतकी हरित हवा निर्माण करेल. गोकुळ मार्फत उभारणी करण्यात आलेला 6.5 मेगा वॅट सोलर प्रकल्प केवळ एक ऊर्जा प्रकल्प नसून पर्यावरण संरक्षण आणि भारताच्या स्वच्छ ऊर्जा अभियानाचा एक महत्वाचा भाग आहे.
- गोकुळ स्वत:चा पेट्रोल पंप सुरु करणार
वीज बिल खर्चातील बचतीनंतर गोकुळ आता पेट्रोल, डिझेल वरील खर्चामध्येही बचत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी गोकुळ लवकरच स्वत:चा पेट्रोल पंप सुरु करणार आहे. दैनंदिन दूध संकलन, वितरण यासह अन्य कामांसाठी गोकुळकडून मोठयाप्रमाणात वाहनांचा वापर केला जातो. वाहतुकीसाठी पेट्रोल, डिझेलवर होणारा गोकुळचा खर्चही मोठा आहे. त्यामुळे स्वत:चा पेट्रोल पंप सुरु करत या खर्चामध्येही बचत करण्यासाठी गोकुळचे प्रयत्न सुरु आहेत.
- पूर्णत: आत्मनिर्भर बनण्याचा मानस
वीज निर्मितीमध्ये पूर्णत: आत्मनिर्भर बनण्याचा मानस गोकुळचा आहे. यासाठी आणखी 4 मे.वॅटचा सौर उर्जा प्रकल्प सुरु करण्याचा प्रयत्न गोकुळचा राहणार आहे. या प्रकल्प कार्यान्वीत झाल्यास गोकूळचा गोकुळ शिरगांव येथील मुख्य प्रकल्प वीज निर्मितीत पूर्णत: आत्मनिर्भर बनणार आहे.

- दूध उत्पादकांना समृद्ध बनविण्याचा प्रयत्न
खर्चामध्ये बचत करत गोकुळशी सलग्न असणारे दूध उत्पादक शेतकरी यांना ज्यादा दर, अन्य आवश्यक सुविधा पुरविणे हे संचालक मंडळाचे धोरण आहे. सौर उर्जा प्रकल्पातुन होणाऱ्या बचतीमधून दूध उत्पादकांना अधिक समृद्ध बनविण्याचा प्रयत्न गोकुळचा असणार आहे.
– अरुण डोंगळे, चेअरमन गोकुळ दूध संघ.
- गोकुळचा सौर उर्जा प्रकल्प संक्षिप्त स्वरुपात
– प्रकल्प क्षमता : 6.5 मेगा वॅट.
– प्रकल्प किंमत : 33.33 कोटी.
– प्र्रकल्पासाठी लागलेली जमीन : 18 एकर.
– गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगांव येथील वार्षिक वीज वापर : 1 कोटी 58 लाख युनिट.
– गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगांव येथील येणारे वार्षिक वीज बिल : 16 कोटी रुपये.
– सोलर प्रकल्पामुळे निर्माण होणारी वार्षिक वीज : 1 कोटी 2 लाख युनिट.
– सोलर प्रकल्पामुळे होणारी वार्षिक बचत : 6 कोटी रुपये.
– प्रकल्प उभारणी केलेल्या कंपनीचे नांव : मे. सर्जन रिअॅलिटीज प्रा. लि. पुणे.
– एकूण वापरलेली सोलर पॅनेल्स : 11,928
– प्रती पॅनेल्स वीज निर्मितीची क्षमता : 545 वॅट
– एकूण इनव्हर्टर्स वापर : 16
– प्रती इर्न्व्हटर क्षमता : 295 कि.वॅट.








