आठ जणांना अटक, 55 लाखाचे दागिने जप्त, दोन घरफोड्यांचाही छडा
प्रतिनिधी / बेळगाव
मंदिरे व घरांना लक्ष्य बनवणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारी टोळीतील आठ जणांना अटक करण्यात आली आहे. गोकाक पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याजवळून 55 लाख 60 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी गुरुवारी रात्री एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
विवेकानंदनगर-गोकाक येथील प्रकाश लक्ष्मण तोळीनावर यांच्या घरी 11 नोव्हेंबर 2022 रोजी झालेली चोरी व तवग, ता. गोकाक येथील बिरसिद्धेश्वर मंदिरात 23 मे 2023 रोजी झालेल्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. आंतरराज्य गुन्हेगारांच्या या टोळीत कोल्हापूर, बेंगळूर, बेळगाव, मुंदगोड, हुबळी, हासन येथील गुन्हेगारांचा समावेश आहे.
गोकाकचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल राठोड, सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर, हुक्केरीचे पोलीस निरीक्षक एम. आर. एम. तहसीलदार, गोकाकचे पोलीस उपनिरीक्षक किरण मोहिते, एम. डी. घोरी, अंकलगीचे पोलीस उपनिरीक्षक एच. डी. यरझरवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली असून विशेष पथकातील अधिकाऱ्यांचे पोलीसप्रमुखांनी कौतुक केले आहे.
अजित शिवराई धनगर, रा. हलकर्णी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर, नागभूषण अंजनप्पा, रा. नारायणपूर, बेंगळूर, रविकुमार कन्हय्या नायडू, रा. चन्नसंद्र, बेंगळूर उत्तर, लक्ष्मणराम तेजराम, रा. बेंगळूर दक्षिण, कृष्णा सुबराय शेठ, रा. शहापूर-बेळगाव, रामचंद्र नागेश रायकर, रा. नेहरुनगर-मुंदगोड, मंजुनाथ नागेश रायकर, रा. हुबळी-शिरसी रोड, मुंदगोड, लिंगराजू ऊर्फ राजू ऊर्फ उमेश ऊर्फ लोकी रामेगौडा, रा. जमनळ्ळी, ता. सखलेशपूर, जि. हासन अशी अटक करण्यात आलेल्या आठ जणांची नावे आहेत.
30 जून ते 24 जुलै यावेळेत ही कारवाई करण्यात आली असून या टोळीकडून 55 लाख 60 हजार रुपये किमतीचे 810 ग्रॅम सोन्याचे दागिने, साडेआठ किलो चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. गोकाक शहर व गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकात दाखल झालेल्या दोन चोरी प्रकरणांचा छडा लागला आहे.









