बिहारमध्ये सरकार बदलण्याच्या चर्चांना दिला पूर्णविराम : भाजप अ
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये मागील काही दिवसांपासून चढलेल्या राजकीय पाऱ्याला मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका वक्तव्याद्वारे शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. नितीश कुमार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना आपण राजदसोबत आता कधीच जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दोनवेळा राजदसोबत जाण्याची मोठी चूक आम्ही यापूर्वी केली आहे. आता ही चूक कधीच करणार नाही.आता आम्ही लालूप्रसाद यादवांसोबत कधीच जाणार नाही असा दावा नितीश कुमार यांनी केला आहे.
राजदसोबत संजद कधीच आघाडी करणार नाही. भाजपसोबत मिळून आम्ही बिहारमध्ये खूप काही काम केले असल्याचे नितीश कुमार यांनी नमूद केले आहे. काही दिवसांपूर्वी राजद नेते आणि लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्यासोबत झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये नितीश कुमार हे पुन्हा भाजपसोबतची आघाडी मोडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. राजदच्या गोटाकडून या चर्चांना खतपाणी दिले जात होते.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत नितीश कुमार यांनी अनेकदा आपण राजदसोबत यापुढे कधीच जाणार नसल्याची घोषणा केली होती. आता निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नितीश कुमार यांनी राजदसोबत कधीच जाणार नसल्याचा पुनरुच्चार केला आहे. यावेळी बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजप अध्यक्ष जगतप्रकाश न•ा हे बिहारच्या दौऱ्यावर आल्यावर ही भूमिका मांडली आहे.
भाजप अध्यक्ष नड्डा यांच्या दोन दिवसीय बिहार दौऱ्याची सुरुवात शुक्रवारी पाटणा येथून झाली आहे. यादरम्यान न•ा यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी चर्चा केली आहे. यावेळी नड्डा यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप जायसवाल, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा देखील उपस्थित होते.
तीन दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आता मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीच वक्तव्य देत या तर्कवितर्कांना रोखण्याचे काम केले आहे. यापूर्वी तेजस्वी यादव यांनी काही भरती प्रक्रियांसंबंधी चर्चा करण्यासाठी नितीश कुमार यांना भेटलो होतो असे सांगत राज्यात सरकार बदलण्याची शक्यता नसल्याचे म्हटले होते. तर दोन्ही नेत्यांची भेट ही राज्यात माहिती आयुक्त निवडण्याच्या मुद्द्याकरता होती असे समोर आले आहे.
तेजस्वी यादव यांची प्रतिक्रिया
नितीश कुमार यांनी राजदसोबत कधीच जाणार नसल्याचे केलेल्या वक्तव्याबद्दल तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नितीश कुमारांनी आमच्यासमोरील जेवणाचे ताट पळविल्याचे सांगायचे, आता हेच नितीश कुमार हे पंतप्रधान मोदींच्या चरणांना स्पर्श करत आहेत. आपण काय बोलत होतो आणि आता काय करत आहोत याचा विचार नितीश कुमार यांनीच करणे गरजेचे असल्याचे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.
राजकीय इतिहास
नितीश कुमार यांच्या संजदने यापूर्वी दोनवेळा भाजपसोबतची आघाडी संपुष्टात आणत राजदसोबत राज्यात सरकार स्थापन केले होते. परंतु दोन्हीवेळा राजदसोबतची त्यांची आघाडी फारकाळ टिकू शकलेली नाही. नितीश कुमार हे अलिकडेच 28 जानेवारी रोजी पुन्हा रालोआत सामील झाले होते. त्यावेळी त्यांनी राजदसोबतची आघाडी संपुष्टात आणत मुख्यमंत्रिपदाचाही राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने राज्यात पुन्हा सरकार स्थापन केले होते. तसेच लोकसभा निवडणूक ही रालोआचा घटक पक्ष म्हणूनच संजदने भाजपसोबत मिळून लढविली होती.









