चोऱ्या टाळण्यासाठी नजीकचे पोलीस स्थानक अन् शेजाऱ्यांना कल्पना द्या : पोलीस अधिकाऱ्यांचा सल्ला
बेळगाव : दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे नोकरदार, परगावचे विद्यार्थी सणासाठी आपल्या गावी परतण्याच्या घाईत आहेत. सध्या बेळगाव शहर व तालुक्यात बंद घरांना लक्ष्य बनविणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीचा वावर वाढला असल्यामुळे गावी जाताना आपली मालमत्ता व किमती ऐवजाच्या सुरक्षेविषयी खबरदारी घेण्याची गरज आहे. गेल्या पंधरवड्यातील घरफोड्यांची घटना लक्षात घेता बंद घरांना लक्ष्य बनविण्यात येत आहे. परप्रांतीय गुन्हेगार बेळगावात सक्रिय आहेत. केवळ शहर व उपनगरच नव्हे तर ग्रामीण भागातील घरे आणि मंदिरांना लक्ष्य बनविण्यात येत आहे. खरेदीसाठी बाजारात जाऊन येईपर्यंत घरफोडी झालेली असते. खासकरून माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात अशा भरपूर घटना घडल्या आहेत.
या घटना लक्षात घेता परगावी जाण्यापूर्वी आपणच आपल्या घराच्या सुरक्षेविषयी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दिवाळी संपेपर्यंत किमान तीन-चार दिवस तरी लोक आपापल्या गावी जातात. याचाच फायदा गुन्हेगार नेहमी घेतात. घरफोड्या करण्यापूर्वी बंद घरांची रेकी केली जाते. पाळत ठेवून घरात कोणी नाही, एक-दोन दिवसांपासून हे घर बंद आहे किंवा घरातील मंडळी बाहेर गेली आहेत, याची खात्री पटल्यानंतरच गुन्हेगार कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करतात आणि किमती ऐवज पळवतात. त्यामुळे परगावी जाताना शेजाऱ्यांना आणि संबंधित पोलीस स्थानकाला माहिती देण्याची गरज आहे. रात्रीच्या वेळी आपल्या घरासमोर लाईट असेल याची व्यवस्था करावी. बाहेरच्यांना दिसेल अशा पद्धतीने कुलूप लावण्यापेक्षा शक्यतो सेंटर लॉक घालावा. आपल्या परिचयातील व्यक्तीला अधूनमधून घरी पाठवून सुरक्षा तपासून पहावी. शेजाऱ्यांनाही घराकडे लक्ष देण्याची विनंती करावी. अशा पद्धतीने खबरदारी घेण्याचा सल्ला पोलीस अधिकाऱ्यांनी दिला आहे. तरच चोऱ्या, घरफोड्या टाळता येणार आहेत, असेही त्यांचे म्हणणे आहे.
लॉकरचा आधार घ्या
सणासाठी परगावी जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या घराच्या सुरक्षेची खबरदारी घेण्याचे आवाहन गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी केले आहे. शेजाऱ्यांना माहिती देण्याबरोबरच परगावी जाण्यापूर्वी आपल्या घरातील किमती वस्तू, दागिने सुरक्षितपणे लॉकरमध्ये ठेवावेत. चोरट्यांना दिसेल अशा पद्धतीने घराला कुलूप लावू नये. सेंटर लॉक लावावेत, असे त्यांनी सांगितले. बाजारपेठेतही खरेदीसाठी गर्दी होते आहे. गर्दीत मोबाईल चोरणे, पाकीटमारीचे प्रकार टाळण्यासाठीही नागरिकांनी सतर्क रहावे. एखादी अप्रिय घटना घडलीच तर तातडीने 112 या क्रमांकावर संपर्क साधून त्याची माहिती देण्याचेही त्यांनी कळविले आहे.
– पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा









