वृत्तसंस्था/गुवाहाटी
आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गौरव गोगोई यांनी ब्रिटिश महिलेशी विवाह केल्यावर संसदेत संरक्षण विषयक संवेदनशील प्रश्न उपस्थित केले असा दावा शर्मा यांनी केला. गौरव गोगोई यांच्या पत्नी एलिझाबेथ कोलबर्न यांचे पाकिस्तान आणि आयएसआयशी संबंध असल्याचा भाजपचा दावा आहे. एलिझाबेथ कोलबर्न यांचे पाकिस्तान नियोजन आयोगाचे सल्लागार अली तौकिर शोख आणि आयएसआयशी असलेले कनेक्शन समोर आल्याचे भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी म्हटले आहे.
गौरव गोगोई यांनी 2015 मध्ये स्वत:ची संस्था ‘पॉलिसी फॉर यूथ’द्वारे पाकिस्तानी उच्चायोगाचा दौरा केला, प्रत्यक्षात तेव्हा ते संसदेच्या विदेश विषयक समितीचे सदस्य देखील नव्हते. यामुळे त्यांच्या भागीदारीमागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. शत्रू देशाच्या राजदूतासोबत अशाप्रकारच्या उच्चस्तरीय चर्चेसाठी विदेश मंत्रालयाची मंजुरी आवश्यक असते. गोगोई यांनी पाकिस्तानच्या कनेक्शनमुळेच संसदेत भारतीय तटरक्षक रडार प्रणाली, शस्त्रास्त्र कारखाने आणि भारत-इराण व्यापार मार्गाशी संबंधित प्रश्न विचारले असल्याचा दावा शर्मा यांनी केला आहे.
गौरव गोगोई यांचे प्रत्युत्तर
गोगोई यांनी भाजपचे आरोप हास्यास्पद आणि मनोरंजक असल्याचे म्हटले आहे. जर माझी पत्नी आयएसआय एजंट असेल तर मी रॉ एजंट आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान माझ्या विरोधात खोटा प्रचार केला होता, परंतु जनता माझ्या पाठिशी उभी राहिली. हेमंत विश्व शर्मा स्वत: जमीन घोटाळ्यात अडकले आहेत. आसाममध्ये पुढील वर्षी निवडणूक होणार असून भाजप जनतेचा भरवसा गमावत आहे. आसाम आणि मणिपूरचे खरे मुद्दे बेरोजगारी, महागाई आणि शांतता प्रस्थापित करणे आहे, ज्यावर काँग्रेस काम करत असल्याचा दावा गोगोई यांनी केला.









