बेळगाव : पदवीपूर्व शिक्षण खाते व त्रिपुरा पीयु कॉलेज आयोजित पदवीपूर्व महाविद्यालयीन सेटल बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटात गोगटे संघाने जीएसएस संघाचा तर मुलींमध्ये केएलई इंडिपेंडेन्ट कॉलेजने जीएसएस बेळगावचा पराभव करुन विजेतेपद पटकाविले. टिळकवाडी येथील आरएमआर बॅडमिंटन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या जिल्हास्तरीय सेटल बॅडमिंटन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आरएलएस महाविद्यालयाचे निवृत्त क्रीडा प्रा. जी. एन. पाटील, जिल्हा स्पर्धेचे समन्वयक प्रभू शिवनायकर, प्रभारी अधिकारी एन. बी. श्रीशाद, त्रिपुरा सायन्स पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्रा. व्यंकटेश सुबय्या आदी मान्यवरांच्या हस्ते बॅडमिंटन नेटला हार घालून उद्घाटन झाले.
या स्पर्धेत जिल्ह्यातील जवळपास मुला, मुलींच्या 15 संघांनी भाग घेतला होता. मुलांच्या गटात पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गोगटे पदवीपूर्व महाविद्यालयाने जैन पीयु कॉलेजचा 2-0 असा तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात जीएसएस संघाने केएलई इंडिपेंडेट संघाचा 2-0 असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात गोगटे कॉलेजने जीएसएसचा 2-0 असा सरळ पराभव करुन विजेतेपद पटकाविले. तर मुलींच्या गटात पहिल्या उपांत्य सामन्यात जीएसएसने गोगटेचा 2-0 तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात केएलईने स्टेट पीयु कॉलेज-रामदुर्गचा 2-0 असा पराभव करुन अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात केएलईने जीएसएसचा 2-1 असा पराभव करुन विजेतेपद पटकाविले. सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेमतून बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघाची राज्यस्तरीय निवड करण्यात आली असून मुलांमध्ये माहीम गाडवी, नमन अणवेकर, प्रथम रायकर, वृषंक व्ही.एच., साईश नेतलकर तर मुलींच्या गटात श्रीनिधी भट्ट, रिशा हेडा, विनीष्का पारिहार, निशिका काळे व प्राजक्ता कुलकर्णी आदी खेळाडूंचा समावेश आहे.









